कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आज शुक्रवारी आपला 14 वा अर्थसंकल्प सादर केला. त्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणात खालील प्रमाणे बेळगावचा उल्लेख झाला.
बेळगावसह म्हैसूर आणि कलबुर्गी जिल्ह्यामध्ये सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल्स आणि जळीत सुश्रुषा केंद्र उभारण्यासाठी एकूण 155 कोटी रुपये दिले जाणार.
राज्यातील पाणीटंचाईवर शाश्वत उपाय काढण्यासाठी जलाशयातील पाणी उपसा करून टाक्या भरण्याच्या 172 योजना हाती घेण्यात आल्या आहेत. टाक्या भरण्याचे 770 कोटी रुपये खर्चाचे 19 प्रकल्प पूर्ण होण्याच्या मार्गावर असून त्याद्वारे बेळगाव दावणगिरी, बेळ्ळारी हावेरी, गदग, बिदर, कारवार, विजयनगरा, कोप्पळ, कलबुर्गी आणि यादगिरी जिल्ह्यातील एकूण 899 पाण्याच्या टाक्या भरल्या जाणार आहेत.
राजीव गांधी आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे बेळगावसह कलबुर्गी, हुबळी, दावणगिरी, मंगळूर आणि म्हैसूर जिल्ह्यात स्टेट -ऑफ -द -आर्ट स्किल लॅब्स, संशोधन केंद्रं आणि इंडोर क्रीडा सुविधा उपलब्ध केल्या जाणार.
तसेच कलबुर्गी आणि म्हैसूर येथे सहयोगी आरोग्य विज्ञान महाविद्यालये स्थापणार. अल्पसंख्यांक युवकांसाठी रामनगर, बेळगाव, दावणगिरी, कलबुर्गी आणि मंगळूर जिल्ह्यामध्ये 4 कोटी रुपये खर्चाचे कौशल्य विकास प्रशिक्षण सुरू केले जाणार.
लघुउद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी कर्नाटक राज्य लघुउद्योग विकास महामंडळाच्या (केएसएसआयडीसी) छत्रछायेखाली टप्प्याटप्प्याने सात ठिकाणी नव्या औद्योगिक वसाहती स्थापन केल्या जाणार. हुबळी, कलबुर्गी येथील चित्तापुरा, कारवार येथील कोडकनी, बेळगाव येथील कणगला, चामराजनगर येथील बंदनगुप्पी, विजयपुरा येथील इंडी आणि यादगिरी येथील शहापुरा येथे या वसाहती निर्माण केल्या जातील.
मनुष्य आणि प्राणी यांच्यातील संघर्षा दरम्यान वाचवलेल्या जखमी अथवा आजारी प्राण्यांची सेवा सुश्रुषा करण्यासाठी त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी असलेले बन्नेरूघट्टा आणि म्हैसूर तेथील पुनर्वसन केंद्रे अधिक विकसित व बळकट करण्यासाठी उपाय योजना हाती घेणे. त्याचप्रमाणे बेळगाव आणि शिमोगा येथे या पद्धतीच्या नव्या पुनर्वसन केंद्राची उभारणी करणे. कित्तूर कर्नाटक प्रदेशातील प्रामुख्याने सौंदत्ती यल्लमा देवस्थानासह अन्य पर्यटन स्थळांचा व्यापक विकास करणे.
कर्नाटकच्या विविध संरक्षित राष्ट्रीय स्मारकांपैकी एक असलेल्या कित्तूर किल्ल्यामधील कला, स्थापत्यशास्त्र आणि संस्कृतीच्या समृद्ध प्रदर्शन घडून रात्र पर्यटनासाठी (नाईट टुरिझम) अधिकाधिक पर्यटक आकर्षित व्हावेत यासाठी त्या ठिकाणी थ्रीडी प्रोजेक्शन, मल्टी-मीडिया, साऊंड आणि लाईट शो कार्यक्रम सुरू करावेत.