सालाबदाप्रमाणे 11 जुलै 2023 रोजी वडगावची ग्रामदैवता श्री मंगाई देवी जत्रा पार पडणार आहे त्यासाठी अवघड वडगाव नगरी सज्ज झालेली आहे. अबाल वृध्द महिला वर्ग यांच्यात उत्साह दिसून येत आहे.
सासुर वासिनी माहेरला परत आलेल्या आहेत लांबलेल्या पावसाने दमदार सुरुवात केल्याने शेतकरी वर्ग काहीसा सुखावला आहे त्यामुळे वातावरण जत्रामय बनलेला आहे.
दरवर्षी येणारी खेळणी विविध वस्तूंची दुकाने त्याचं बरोबर स्थानिक व्यापाऱ्यांनी थाटलेली दुकाने यामुळे जत्रेच माहोल तयार झालेला आहे. लहान मुले उभारण्यात येणाऱ्या पाळणे, झुले इतर खेळ यांच्या शेजारी कोंडाळे करून निरीक्षणात गुंतली आहेत. जत्रेसाठी आणलेले ठगगर,मेंढे बकरी आणि कोंबड्यांच्या आवाजाने परिसर गजबजून जात आहे.
पूजा साहित्य, नारळ हार,सौंदर्य प्रसाधने यांच्या दुकानांची रेलचेल दिसत आहे लहान मुले ठग्गर मेंढे घेऊन गल्ली बोळातून धावपळ करत आहेत काही ठिकाणी तर मेंढ्यांच्या टक्करी लाऊन आनंद लुटला जात आहे.प्रशासनही स्वच्छता करणे औषध फवारणी रस्त्याची डागडुजी यात गुंतलेली आहे.
जागृत देवस्थान म्हणून वडगावाची श्री मंगाई देवस्थानची ख्याती आहे वर्षभर बेळगाव परिसरातील भाविक या यात्रेची वाट बघत असतात पाहुण्यांना आमंत्रण देऊन घरटी जत्रा मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. देवीच्या मंदिराचा परिसर आता चोहो बाजूंनी कठडे बांधून बंधिस्त करण्यात आलेला आहे त्यामुळे शिस्तबध्द रित्या जत्रा होण्यास मदत होईल त्या शिवाय मंदिर परिसरात भाविकांच्या दर्शनेच्या सोयीसाठी रेलिंग टाकण्याचे काम देखील सुरू आहे मंदिराची रंगरंगोटी करण्यात आली असून सजावटीचे काम देखील पातळीवर सुरू आहे.
श्रावण महिन्याच्या पूर्वसंध्येला मांसाहारी आहाराची ही यात्रा बेळगाव वात मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध आहे.या दिवसांत बहुतांश बेळगावकर वडगाव करांचा पाहुणचार अनुभवतात मुख्य दोन दिवस चालणारी ही जत्रा पुढेही सात दिवस सुरूच असते. जत्रा यात्रांच्या निमित्ताने गावगड्यात आर्थिक उलाढाल मोठ्या प्रमाणात होत असल्याने व्यापारी वर्गही या दिवसांत लघबगीत असतो मुख्य यात्रेच्या दिवशी दुकाने हॉटेल फिरते व्यापारी जवळ जवळ रात्रभर जत्रेत दंग असतात अशी ही निसर्गाच्या सृजनतेच्या पूर्वसंध्येला येणारी जत्रा लोकप्रिय तर आहेच त्याचबरोबर मंगाई देवीच्या श्रद्धास्थानाचे महात्म्य टिकून आहे.
वडगाव शिवार,शहापूर शिवार बेळगाव शिवार सर्व पाचूच्या रंगा सारखा हिरवागार झाला आहे. विविध रंगाची फुले फुलल्याने माहोल देखील रंगबेरंगी झाला आहे. धावणारे ओढे पडणारा पाऊस, खाऱ्या जेवणाचे ताट अशाच थाटाची ही जत्रा वडगावकरांची लाडकी जत्रा आहे.