नद्या आणि जलाशयांची पाणी पातळी, पावसाचे प्रमाण आणि महाराष्ट्रातील जलाशयातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याचे प्रमाण यावर लक्ष ठेवून अत्यंत वैज्ञानिक पद्धतीने परिणामकारकरित्या पूर परिस्थिती हाताळली जावी. त्यासाठी यावर संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांनी जातीने लक्ष ठेवावे अशी सूचना ग्रामीण विकास आणि पंचायत राज खात्याचे मुख्य सचिव तथा बेळगाव जिल्हा प्रभारी सचिव अंजुम परवेज यांनी केली आहे.
जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे बाधित गावांना आणि निवारा केंद्रांना आज गुरुवारी भेटी दिल्यानंतर चिक्कोडी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या सभागृहात आयोजित जिल्हास्तरीय प्रगती आढावा बैठकीत ते बोलत होते. पावसाचे प्रमाण आणि महाराष्ट्रातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याच्या अनुषंगाने येथील अधिकाऱ्याने तेथील अधिकाऱ्यांच्या संपर्कात राहून समन्वयाने कार्य करावे. अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेल्या घरांच्या सर्वेक्षणास कोणत्याही कारणास्तव विलंब केला जाऊ नये. त्याचप्रमाणे मनुष्यहानी अथवा प्राण्यांची जीवित हानी झाली असल्यास संबंधितांना तात्काळ नुकसान भरपाई देण्यासंदर्भात क्रम घेतले जावेत असे परवेज यांनी पुढे स्पष्ट केले.
बेळगाव हा मोठा जिल्हा असल्यामुळे पूर परिस्थिती हाताळण्यात स्थानिक पातळीवरील कार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांची भूमिका महत्त्वाची असते. यासाठी येथे उपस्थित सर्व अधिकाऱ्यांनी एकमेकात समन्वय राखून काम करण्याद्वारे पूर परिस्थिती हाताळली पाहिजे असेही ते म्हणाले.
पीडिओ, महसूल निरीक्षक, ग्राम लेखापाल अधिकाऱ्यांनी प्रत्येक गावाला भेट देऊन तेथील धोकादायक स्थितीत असलेल्या घरांची पाहणी करावी आणि संबंधित कुटुंबाला सावध करावे. त्याचप्रमाणे आवश्यकता भासल्यास त्या कुटुंबांना अन्यत्र सुरक्षित स्थळी निवारा उपलब्ध करून द्यावा, अशी सूचना जिल्हा प्रभारी सचिव अंजुम परवेज यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना केली.
अतिवृष्टी आणि पूरसदृश्य परिस्थितीमुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात. यासाठी पाणी ओसरताच प्रत्येक गावात स्वच्छता मोहीम राबविली जावी. सध्याच्या एकंदर परिस्थितीत महसूल ग्राम विकास आणि पोलीस खाते यांच्यात समन्वय असणे अतिशय महत्त्वाचे आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
बैठकीत अंजुम परवेज यांनी अन्य संबंधित विषयांवर चर्चा करून उपस्थित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना केल्या. बैठकीस जि. पं. मुख्य कार्यकारी अधिकारी हर्षल भोयर, प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी शुभम शुक्ला, चिक्कोडी उपविभागीय अधिकारी माधव गीते आदींसह संबंधित अन्य खात्यांचे अधिकारी उपस्थित होते.