मच्छे (ता. जि. बेळगाव) गावामध्ये अलीकडेच बसविण्यात आलेली क्रांतिवीर संगोळ्ळी रायण्णा यांची मूर्ती सध्याच्या गलिच्छ जागेतून हटवून चांगल्या स्वच्छ मोक्याच्या जागी बसवण्यात यावी, अशी मागणी समस्त मच्छे गावकऱ्यांनी गावच्या नगर पंचायतीसह पोलीस प्रशासनाकडे केली आहे.
मच्छे गावच्या देवपंच कमिटीच्या नेतृत्वाखाली आज सोमवारी सकाळी उपरोक्त मागणीचे निवेदन मच्छे नगरपंचायतीचे मुख्य अधिकारी शिवकुमार आणि बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांना सादर करण्यात आले. मच्छे गावात नगरपंचायती समोर असलेल्या गावच्या सोसायटीच्या जागेत अलीकडेच गेल्या 5 जुलै रोजी क्रांतीवीर संगोळी रायण्णा यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे.
मात्र ज्या जागेत ही मूर्ती बसविण्यात आली आहे त्या जागेमध्ये पूर्वी सार्वजनिक शौचालय व मुतारी होती. त्यामुळे अशा गलिच्छ जागेमध्ये वीर संगोळी रायण्णा यांच्यासारख्या महान क्रांतिवीराची मूर्ती ठेवू नये.
यासाठी सध्याच्या ठिकाणी असलेली मूर्ती तात्काळ तेथून हटवून गावातील अन्य स्वच्छ अशा मोक्याच्या जागी बसविण्यात यावी, अशा आशयाचा तपशील निवेदनात नमूद आहे.
निवेदन सादर करतेवेळी मच्छे देवपंच कमिटीच्या सदस्यांसह गावातील सर्व युवक व महिला मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि गावकरी उपस्थित होते.