सध्या पडत असलेल्या पावसामुळे महांतेशनगर ते रुक्मिणीनगर पर्यंतच्या दुपदरी मार्गाची पार दुर्दशा झाल्यामुळे वाहन चालकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून हा रस्ता त्वरित दुरुस्त करण्याची मागणी केली जात आहे.
महांतेशनगर ते रुक्मिणीनगर पर्यंतचा दुपदरी रस्ता सध्या पावसामुळे जवळपास पूर्णपणे उखडला गेला आहे. सदर रस्त्यावरील डांबरीकरण उखडून मोठ्या प्रमाणात खाचखळगे पडले आहेत. येथील कांही ठिकाणचे खड्डे इतके मोठे आहेत की या रस्त्यावर कोणत्याही क्षणी विशेषतः रात्रीच्या वेळी गंभीर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
उखडलेल्या रस्त्यामुळे पसरलेली खडी देखील वाहन चालकांसाठी विशेष करून दुचाकी चालकांसाठी धोकादायक ठरू शकते.
दुर्दशा झालेल्या या रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये पावसाचे गढूळ पाणी साचण्याबरोबरच ठीक ठिकाणी रस्त्याकडेला पाण्याची तळी निर्माण झाली आहे.
एकंदर महांतेशनगर ते रुक्मिणीनगर पर्यंतच्या दुपदरी रस्त्याची पार दुरवस्था झाली असल्यामुळे त्याची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी अशी जोरदार मागणी केली जात आहे.