Monday, January 20, 2025

/

मनपा आयुक्तांनी ‘या’ अतिक्रमणाकडे लक्ष देण्याची मागणी

 belgaum

जनतेच्या समस्या जाणून घेऊन त्या तत्परतेने सोडवण्यासाठी कार्यरत असलेले महापालिकेचे नूतन आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी सर्वांसाठी त्रासदायक ठरत असलेले बाजार गल्ली वडगाव येथील भाजीपाला, फळं, फूलं विक्रेते व दुकानदारांचे रस्त्यावरील अतिक्रमण तात्काळ हटवावे, अशी जोरदार मागणी परिसरातील नागरिक आणि शेतकऱ्यांकडून केली जात आहे. तसेच अतिक्रमण न हटवल्यास त्यांनी आंदोलनाचा इशाराही दिला आहे.

अलिकडेच नुतन मनपा आयुक्त म्हणून रुजू झालेले अशोक दुडगुंटी जनतेच्या समस्या जाणून त्या सोडवण्यासाठी सतत कार्यरत असतात. आत्ताच त्यांनी हनुमाननगर येथील रस्त्याच्या पदपथावर व्यावसायिकांनी केलेले अतिक्रमण हटवून आपल्या कार्यतत्परतेची चुनूक दाखवून दिली. हनुमाननगर सारखी परिस्थिती सध्या वडगावच्या बाजार गल्लीत झाली आहे.

येथील भाजीपाला, फळंफुलं तसेच इतर विक्रेते आणि दुकानदारांनी जणू कांही बाजारगल्ली स्वत:च्याच मालकिची असल्याप्रमाणे आपल्या व्यवसायासाठी अर्धा रस्ता अतिक्रमण करून व्यापला आहे. त्यामुळे रहदारीस मोठा अडथळा निर्माण होत आहे

शहापूर व रयत गल्ली वडगाव भागातील शेतकरी शहापूर शिवारात असलेल्या आपल्या शेताकडे जाण्यासाठी पूर्वापार याच बाजारगल्ली रस्त्याचा वापर करतात. हे शेतकरी शेताकडे ये -जा करण्यासाठी बैलगाड्या आणि दुचाकींचा वापर करतात. मात्र सध्या या रस्त्यावर झालेल्या विक्रेत्यांच्या अतिक्रमणामुळे शेतकऱ्यांना ये-जा करणे अवघड झाले आहे. बैलगाड्या घेऊन जाणारे शेतकरी आणि भाजीविक्रेते यांच्यात वारंवार भांडणाचे प्रसंग घडत आहेत.

अरेरावीची भाषा वापरणारे भाजी विक्रेते रस्त्यावर आधारित मोकळा करून देण्याऐवजी तुम्ही तुमच्या बैलगाड्या दुसऱ्या बाजूने घेऊन जा असे शेतकऱ्यांना बजावत आहेत. त्यांचे एकंदर वर्तन पाहता बाजार गल्ली ही भाजीपाला, फळ व इतर विक्रेत्यांच्या मालकीची आहे कि काय? असा प्रश्न शेतकरी आणि स्थानिकांना पडू लागला आहे.

मागे एकदा रस्त्यावरील याच व्यावसायिकांनी शेतातील भाजी विक्रिसाठी आलेल्या शेतकऱ्याला इतकी बेदम मारलं कि त्याला दवाखान्यात दाखल व्हाव लागल. त्यावेळी शेतकऱ्यांनी रयत संघटनेच्या नेतृत्वाखाली मोर्चाने महापालिकेवर जाऊन वडगाव बाजार गल्लीतील अतिक्रमण हटवून जनतेला व शेतकऱ्यांना रस्ता खुला करावा अशी मागणी केली होती. मनपा आयुक्तनां प्रत्यक्ष भेटून निवेदन दिले होते. तेंव्हा त्याच दिवशी कारवाई करण्याचे नाटक झाले पण दुसऱ्या दिवशीपासून येरे माझ्या मागल्या अशी परिस्थिती झाली. आता तर अर्धा रस्ता व्यापून भाजी व फळ विक्रेत्यांनी कहरच केला आहे त्यामुळे अतिक्रमण करणारे व्यावसायिक -विक्रेते आणि मनपा कर्मचारी व संबधीत नगरसेवक यांच्यात संगणमत तर नाही ना? असा संशय लोकांना येऊ लागला आहे. बाजार गल्ली व्यतिरिक्त इतर जागी व्यवसाय करणाऱ्यांस शेतकरी आणि स्थानिकांचा विरोध नाही. मुख्य बाजारगल्ली खुली करुन तेथील अतिक्रमण हटवल्यास शेतकरी व जनतेला दिलासा मिळणार आहे. अन्यथा शेतकऱ्यांसमोर आंदोलन केल्याशिवाय पर्याय उरणार नाही. एक दिवस शहापूर, रयत गल्ली वडगावमधील शेतकरी आपल्या बैलगाड्यासह उग्र आंदोलन छेडून रस्त्यावरील अतिक्रमण हटवल्याशिवाय राहणार नाहीत असा इशाराही देण्यात आला आहे.

तेंव्हा नूतन मनपा आयुक्तांनी वडगाव बाजार गल्लीला प्रत्यक्ष भेट देऊन तेथे भाजीपाला, फळं, फूलं विक्रेते व दुकानदारांनी किती अतिक्रमण केल आहे याची पहाणी करावी. तसेच रस्त्यावरील अतिक्रमण तात्काळ हटवावे आणि हनुमाननगर प्रमाणे येथील जनता आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून देऊन दिलासा द्यावा, अशी जोरदार मागणी केली जात आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.