बेळगाव लाईव्ह : बेळगाव महापालिकेमध्ये वर्षानुवर्षे ठाण मांडून असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बाबतीत नियमानुसार तात्काळ बदली प्रक्रिया राबविण्यात यावी, या आपल्या विनंतीची दखल घेत महापौरांनी आज महापालिका आयुक्तांना त्यासंदर्भात क्रम घेण्याची सूचना केली असल्याची माहिती प्रभाग क्र. ७ चे नगरसेवक डॉ. शंकरगौडा बी. पाटील दिली.
नगरसेवक डॉ. शंकरगौडा बी. पाटील उपरोक्त विनंतीचे निवेदन गेल्या ९ जून रोजी महापौर शोभा सोमनाचे यांना सादर केले होते. सदर निवेदनाची गांभीर्याने दखल घेत महापौरांनी महापालिका आयुक्तांना नगरसेवक डाॅ. पाटील यांच्या विनंतीत तथ्य असल्यामुळे त्या अनुषंगाने आवश्यक कार्यवाही करण्याची सूचना केली आहे.
सरकारी नियमानुसार ए -ग्रेड अधिकाऱ्यांची दर अडीच ते तीन वर्षांनी अन्यत्र बदली झाली पाहिजे. त्याचप्रमाणे बी आणि सी -ग्रेड अधिकारी कर्मचाऱ्यांचा ५ वर्षातून एकदा कार्यालया अंतर्गत खाते बदल झाला पाहिजे.
मात्र बेळगाव महापालिकेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बाबतीत तसे घडले नसल्यामुळे निर्माण होत असलेल्या समस्या या संदर्भातील तपशील नगरसेवक डॉ. पाटील यांच्या निवेदनात नमूद होता. निवेदनाद्वारे त्यांनी संबंधित अधिकारी व कर्मचारी यांची तात्काळ बदली करावी अशी विनंती केली होती.
यासंदर्भात बेळगाव लाईव्हशी बोलताना नगरसेवक डॉ. शंकरगौडा बी. पाटील म्हणाले की, माहिती हक्क कायद्याअंतर्गत आपण महापालिका आयुक्तांकडे आपल्या महापालिकेत किती लोक काम करतात? आणि किती वर्षापासून काम करतात? तसेच एखाद्या विभागात ते किती काळ काम करू शकतात? याची लेखी माहिती मागितली होती. तेंव्हा त्यांनी पत्राद्वारे महापालिकेतील जवळपास शंभरहून अधिक अधिकारी व कर्मचारी रुजू झाल्यापासून कोठेही बदली न होता ५ वर्षाहून अधिक काळ एकाच ठिकाणी, एकाच विभागात काम करत असल्याचे स्पष्ट केले आहे.
हे सरकारी नियमाविरोधात असल्यामुळे अनेकजण महापालिकेत ३० -३० वर्षे झाली तरी एकाच विभागात ठाण मांडून बसले आहेत. तेंव्हा अशा सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांची बदली करावी अशी विनंती मी माननीय महापौरांकडे केली होती. त्याची दखल घेऊन आज (मंगळवारी) महापौरांनी सरकारी नियम आणि नगरसेवक डॉ. शंकरगौडा पाटील यांच्या विनंतीनुसार संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बाबतीत आवश्यक क्रम घेण्यात यावेत, अशी सूचना महापालिका आयुक्तांना केली आहे.
महापालिकेत ठाण मांडून बसलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांमुळेच भ्रष्टाचार बोकाळाला आहे. चांगले मुरलेले हे अधिकारी व कर्मचारी कामचुकार झाल्यामुळे लोकांची कामे होईनाशी झाली आहेत असा आरोप करून संबंधितांची बदली झालीच पाहिजे असे माझे स्पष्ट मत आहे, असे नगरसेवक डाॅ. पाटील म्हणाले.