पाण्याची पाईपलाईन घालण्यासाठी रस्त्याकडेने खोदण्यात आलेल्या मोठ्या चरित कोसळून खोल खाली अडकून पडलेल्या दोन गाईंपैकी एका गाईचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना गणेशपुर रोडवरील मिलिटरी फार्म जवळ आज सकाळी घडली.
गणेशपुर रोडवरील मिलिटरी फार्म समोरील रस्त्याच्या कडेने मोठी पाण्याची पाईपलाईन घालण्याचे काम सुरू आहे. यासाठी खोल मोठी चर खोदून पाईप घालण्यात आले असून काम पूर्ण झाले नसल्यामुळे चर बुजवण्यात आलेली नाही.
त्यामुळे या धोकादायक खुल्या चरीमध्ये दोन गाई कोसळून अडकून पडल्या होत्या. याबाबतची माहिती मिळताच संतोष दरेकर, नरेश निलजकर, अवधूत तुडवेकर, सौरभ सावंत, वरून कारखानीस, आतिश धटोंबे आदींनी घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्य हाती घेतले. या कार्यकर्त्यांनी चरीत खोल खाली कोसळलेल्या गाईंना दोरीला पट्टा बांधून जेसीबीच्या सहाय्याने बाहेर काढले.
याप्रसंगी पोलिसांसह लष्करी जवान उपस्थित होते. चरीतून बाहेर काढलेल्या दोन गाईंपैकी जबर दुखापत होण्यासह बराच काळ अडकून पडल्यामुळे एका गाईचा मृत्यू झाला होता. त्या मृत गाईवर रस्त्याशेजारीच मोकळ्या जागेत खड्डा खोदून अंत्यसंस्कार करण्यात आले.
गाईचे अंतिम विधी रहदारी पोलीस श्रीधर कुटोळी यांनी केले. गाईंच्या बाबतीत घडलेल्या दुर्घटनेमुळे रस्त्यावरून ये -जा करणाऱ्या नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत होती.
त्याचप्रमाणे पाण्याची पाईपलाईन घालण्याचे काम करणाऱ्या कंत्राटदाराने यापुढे तरी आवश्यक खबरदारी घ्यावी आणि रस्त्याशेजारी खोदलेल्या चरीच्या ठिकाणी योग्य प्रकारे बॅरिकेट्स लावावेत, अशी मागणी केली जात आहे.