बेळगाव लाईव्ह : कर्नाटक सरकारच्या पाच हमी योजनांपैकी एक असणाऱ्या ‘गृहलक्ष्मी’ योजनेसाठी अर्ज भरणा प्रक्रियेला सुरुवात झाली असून अनेक ऑनलाईन सेंटरमध्ये या योजनेच्या फॉर्मसाठी पैसे आकारण्यात येत असल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत.
यासंदर्भात महिला आणि बालकल्याण विकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी आज प्रसारमाध्यमांशी बोलताना, अशापद्धतीने जर कुणी पैसे आकारत असतील तर त्यांच्यावर तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल, शिवाय ऑनलाईन सेंटरमध्ये गृहलक्ष्मी योजनेच्या नोंदणीसाठी पैसे आकारत असतील तर त्यांची लॉग-इन आयडी आणि पासवर्ड रद्द केला जाईल, असा इशारा दिला आहे.
राज्यभरातील महिला या योजनेचा लाभ घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात ऑनलाईन सेंटरवर अर्ज भरण्यासाठी जात आहेत.
मात्र विविध ठिकाणी या योजनेच्या फॉर्मसाठी पैसे आकारण्यात येत असल्याचे निदर्शनात आले आहे. हि योजना पूर्ण पणे मोफत असून सरकारच्यावतीने नोंदणीकृत ऑनलाईन सेंटर धारकांना प्रत्येक फॉर्मसाठी १२ रुपये शुल्क मानधनाच्या स्वरूपात देण्यात येत आहेत.
त्यामुळे या योजनेसाठी कुणीही पैसे आकारल्याचे आढळून आल्यास याबाबत तात्काळ नजीकच्या पोलीस स्थानकात किंवा जिल्हाधिकाऱ्यांना तक्रार करावी, संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल, इतकेच नव्हे तर या योजनेसंदर्भात तहसीलदार, पीडीओ किंवा कुणीही बेजबाबदारीने वागत असल्याचे आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असा इशाराहि मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिला.
[…] post It is a criminal offense to do ‘this’ in Grihalakshmi Yojana! appeared first on Belgaum […]