बेळगाव मध्यवर्ती बस स्थानकामध्ये (सीबीटी) कांही मिनिटांसाठी पार्क केलेल्या दुचाकी वाहनांची हवा सोडण्याचा प्रकार एका पोलीस कर्मचारी सदृश्य व्यक्तीकडून केला जात असल्यामुळे वाहनधारकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
सध्या बेळगाव मध्यवर्ती बस स्थानकामध्ये काही मिनिटांसाठी पार्क केलेल्या दुचाकींच्या चाकामधील हवा सोडण्याचा प्रकार एका पोलीस सदृश्य व्यक्तीकडून केला जात आहे. जाब विचारल्यास नो पार्किंगमध्ये गाडी पार्क केल्यामुळे हवा सोडत असल्याचे सांगत आहे.
सदर बस स्थानकावर आपल्या नातलगांना सोडण्यास, घेऊन जाण्यास किंवा एक दिवसासाठी परगावी जाऊन येणाऱ्या दुचाकी वाहनधारकांसाठी स्थानकाबाहेर कांही अंतरावर पार्किंगची सोय करण्यात आली आहे. मात्र बऱ्याचदा आपल्या वयोवृद्ध, आजारी किंवा दिव्यांग नातलगाला सोडण्यासाठी किंवा घेऊन जाण्यासाठी दुचाकी वाहन चालकांना थेट बस स्थानकामध्ये जावे लागते.
तसेच आपल्या नातलगाला बसमध्ये बसविण्यासाठी किंवा घेऊन येण्यासाठी त्यांना कांही मिनिटांसाठी दुचाकी बस स्थानकामध्येच पार्क करावी लागते. अशा दुचाकी धारकांना सध्या पोलीस सदृश्य व्यक्तीकडून दुचाकींची हवा सोडण्याच्या प्रकाराचा फटका बसत आहे.
दुचाकीची हवा सोडण्याच्या या प्रकारामुळे संबंधित दुचाकी वाहन चालक आणि वयोवृद्ध प्रवाशांना त्रास, मनस्ताप सहन करावा लागत आहे. नो पार्किंगमध्ये वाहन पार्क असेल तर दंड करावा, अशा पद्धतीने टायर मधील हवा सोडून त्रास देऊ नये असे मत त्यांच्याकडून व्यक्त केले जात आहे. तसेच गाड्यांची हवा सोडण्याचा हा प्रकार कोणाच्या आदेशावरून केला जात आहे? असा सवाल ही केला जात आहे.
तरी केएसआरटीसीडेपो मॅनेजरसह वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन योग्य ती कार्यवाही करावी. तसेच दुचाकी मधील हवा सोडणारी ती व्यक्ती नक्की पोलीस आहे, होमगार्ड आहे की कोणी विघ्न संतोषी इसम आहे, हे देखील तपासण्याची मागणी केली जात आहे.
बेळगाव मध्यवर्ती बस स्थानकामध्ये (सीबीटी) कांही मिनिटांसाठी पार्क केलेल्या दुचाकी वाहनांची हवा सोडण्याचा प्रकार एका पोलीस कर्मचारी सदृश्य व्यक्तीकडून केला जात असल्यामुळे वाहनधारकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. pic.twitter.com/MIK7DSRRtR
— Belgaumlive (@belgaumlive) July 17, 2023