Wednesday, January 22, 2025

/

कचरा प्रश्नी नागरिकांनीही जबाबदारीने वागणे गरजेचे

 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगावमध्ये ठिकठिकाणी कचरा समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे. काही ठिकाणी प्रशासन तर काही ठिकाणी नागरिक या समस्येसाठी जबाबदार ठरत आहेत. कचरा समस्या सोडविण्यासाठी स्वच्छ भारत योजने अंतर्गत घंटा गाडीच्या माध्यमातून कचऱ्याची उचल होत आहे मात्र अनेक ठिकाणी रस्त्यावर नागरिकांच्या बेजबाबदारपणाचे चित्र दिसून येत आहे.

बेळगाव शहरात विविध ठिकाणच्या परिसरात रस्त्याच्या बाजूला टाकलेल्या कचऱ्यामुळे, टाकाऊ वस्तूंमुळे नागरिकांनाच नव्हे तर आजूबाजूला असलेल्या शेतकऱ्यांना देखील त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. बेळगाव शहराच्या आजूबाजूला असणाऱ्या प्रत्येक रस्त्यावर जागोजागी प्लॅस्टिकमध्ये भरून कचरा फेकण्यात येत असल्याचे चित्र अनेक ठिकाणी दिसून येत आहे. मद्यपींकडून शेतशिवारांना लक्ष्य करून, रात्री पार्ट्या आटोपून शेतीसह रस्त्याशेजारी कचरा टाकण्याचे प्रमाणा वाढले आहे.

यामुळे पर्यावरणाची हानी तर होतच आहे मात्र शहराच्या अस्वच्छतेत देखील वाढ होत आहे. याचा फटका नागरिकांच्या आरोग्यावर देखील होऊ शकतो. विविध ठिकाणी नागरिकांनी कचरा भिरकावून रस्त्याला कचरा कुंडीचे स्वरूप दिले आहे. कित्येक ठिकाणी स्थानिक प्रशासनाने ती जागा स्वच्छ करून तेथे कचरा न टाकण्याचे आवाहन करणारे फलक लावले आहेत. मात्र एकीकडे स्वच्छता केल्यानंतर लगेचच दुसऱ्या ठिकाणाला कचरा टाकण्याचे ठिकाण बनविण्यात नागरिक धन्यता मानत आहेत. ही मानसिकता नेमकी कशासाठी नागरिकांमध्ये येत आहे, ही बाब अद्यापही अनुत्तरित आहे.Garbage problem

प्रशासन आपल्यापरीने सर्वतोपरी बेळगाव स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्नशील आहे. मात्र बेळगावच्या विद्रुपीकरणात आता हळूहळू नागरिकांनीही आपल्या बेशिस्तीचे दर्शन घडवायला सुरुवात केली आहे. एकीकडे प्रशासनाच्या नावाने ठो ठोकणारे नागरिक आणि दुसरीकडे अशापद्धतीने बेजबाबदारपणाने वागणारे नागरिक यामुळे बेळगावच्या समस्येमध्ये अधिक भर पडत चालली आहे. कचऱ्याच्या पिशवीतून भिरकावण्यात येणाऱ्या प्लास्टिक बॉटल्स आणि काचेमुळे जनावरांनादेखील धोका संभवतो.

मात्र ही बाब स्वतःला सुजाण म्हणवणाऱ्या अनेक नागरिकांच्या लक्षात अद्यापही आलेली नाही. नागरिकांचा हा बेशिस्तपणा राष्ट्रीय संपत्तीचें नुकसान करणारा ठरत आहे. आपण एक जागरूक आणि जबाबदार नागरिक म्हणून आपल्या परिसराची स्वच्छता राखणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. पर्यावरण प्रदूषणाचा धोका लक्षात घेत प्रत्येक नागरिकाने आपली जबाबदारी ओळखून खऱ्या अर्थाने जागरूक नागरिक होण्याचा मान मिळविणे गरजेचे आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.