कर्नाटक राज्यात आणि देशामधील महिला -युवतींवरील वाढत्या अत्याचारासह त्यांच्या होणाऱ्या हत्त्यांच्या निषेधार्थ कर्नाटक भीम सेनेतर्फे आज निदर्शने करत राज्यपालांच्या नांवे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले.
कर्नाटक भीम सेनेचे बेळगाव जिल्हाध्यक्ष प्रवीण मादार यांच्या नेतृत्वाखाली राज्यात आणि देशामधील महिला -युवतींवरील वाढत्या अत्याचारासह त्यांच्या होणाऱ्या हत्त्यांच्या निषेधार्थ तसेच या प्रकारांना आळा घालण्यासाठी गुन्हेगारांना कडक शासन करावे, अशा मागणीचे निवेदन आज मंगळवारी सकाळी जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले.
जिल्हाधिकाऱ्यांच्या सहाय्यकांनी राज्यपालांच्या नावे असलेले हे निवेदन स्वीकारून योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. याप्रसंगी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना प्रवीण मादार म्हणाले की, मणिपूर येथे दोन महिन्यापूर्वी एका महिलेची रस्त्यावर विवस्त्र धिंड काढून तिच्यावर लैंगिक अत्याचार केले गेले.
याबाबत नॉर्थ अमेरिकन ट्रायबल असोसिएशनने गेल्या 12 जून रोजी राष्ट्रीय महिला आयोगाकडे तक्रार करून देखील त्यांच्याकडून अद्यापपर्यंत कोणतीच कृती झालेली नाही. आता अलीकडे त्या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच राष्ट्रीय महिला आयोग जागे झाले असून त्यांनी आवश्यक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘बेटी बचाव बेटी पढावो’ असे म्हणत आहेत. मात्र प्रत्यक्षात आपल्या देशात महिला व युवती सुरक्षित नाहीत. कारण त्यांच्या बाजूने आवाज उठवण्यासाठी कोणीच पुढे येत नाही.
खरंतर पंतप्रधान मोदी यांनी महिला व युवतींवरील अत्याचारा विरोधात आवाज उठवला पाहिजे. पंतप्रधान मोदी आणि मणीपूर सरकारने महिलांवरील अत्याचाराची गांभीर्याने दखल घेऊन गुन्हेगारांना कठोर शासन करावे यासाठी आम्ही कर्नाटक भीम सेनेतर्फे आज जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्यपालांना निवेदन सादर करत आहोत असे सांगून याव्यतिरिक्त महिला व युवतींवरील अत्याचाराच्या निषेधार्थ येत्या 27 जुलै रोजी कर्नाटक भीम सेनेतर्फे राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात आंदोलन छेडण्यात येणार आहे, अशी माहितीही जिल्हाध्यक्ष प्रवीण मादार यांनी दिली.
याप्रसंगी भीमसेन यांचे जिल्हा उपाध्यक्ष अक्षय के. आर., राजू नायक, यल्लाप्पा अक्कमड्डी, निखिल कोलकार, नहीम मुजावर आदी उपस्थित होते.