बेळगाव लाईव्ह : बेळगावमधील रस्ते आणि रस्त्यांवर पडलेले खड्डे यांचे नाते अतूट आहे! बेळगावमध्ये बहुतांशी रस्ते हे खड्ड्यांनीच भरलेले आहेत!
कोणतीही योजना असो किंवा दुरुस्तीकाम सुस्थितीत असलेले रस्तेही लगोलग उखडून काम सुरु केले जाते. नव्याने केलेल्या रस्त्यांची चाळण पहिल्याच पावसात उडते! मात्र अशा रस्त्यांमुळे आणि रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो.
पावसाळाच नव्हे तर वर्षातील १२ महिने या खड्डयांसंदर्भात अनेक तक्रारी आणि निवेदनांचा पाऊस पडतो. मात्र याचा काहीच उपयोग होत नाही.
प्रशासन दखल घेवो अगर न घेवो आज टिळकवाडी येथील रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासाठी रहदारी पोलिसांनी पुढाकार घेतल्याचे दिसून आले. टिळकवाडी दुसऱ्या रेल्वेगेटनजीक खड्डेमय रस्ता झाला आहे. हे खड्डे बुजविण्यासाठी येथील रहदारी विभागातील पोलीस कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेत खड्डे बुजविण्यासाठी पुढे पाऊल टाकले.
सदर खड्डे बुजवितानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वायरल होत असून रहदारी पोलिसांनी केलेल्या या कार्याचे नागरीकातून कौतुक तर होतच आहे शिवाय प्रशासनाच्या कारभारावर ताशेरेही ओढले जात आहेत.
सार्वजनिक बांधकाम खात्याच्या माध्यमातून हे काम लोकप्रतिनिधी किंवा महानगरपालिकेच्या वतीने होणे आवश्यक आहे. मात्र याकडे मनपा आणि लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष झाल्याने हि वेळ आली आणि अखेर रहदारी पोलिसांनाच पुढाकार घ्यावा लागला, अशा प्रतिक्रियाही सोशल मीडियावर व्यक्त होत आहेत.