बेळगाव लाईव्ह : बेळगावचे नंबर वन मराठी वेब न्यूज चॅनेल असलेल्या ‘बेळगाव लाइव्ह’च्या माध्यमातून सातत्याने नागरी समस्यांवर प्रकाशझोत टाकण्यात येतो.
याच माध्यमातून काल अनगोळ स्मशानभूमी परिसरात असलेल्या सीडी वर्कला पडलेल्या भगदाडासंदर्भात बातमी प्रसिद्ध करण्यात आली होती. या बातमीची दखल घेत मनपाने तातडीने दुरुस्तीचे कामकाज हाती घेतले आहे.
निकृष्ट बांधकामामुळे अनगोळ स्मशानभूमीला लागून असलेल्या रस्त्यावर मधोमध सीडी वर्कला धोकादायक भगदाड पडले आहे. याची त्वरित दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरीकातून केली जात आहे.
अनगोळ स्मशानभूमीला लागून असलेल्या रस्त्याच्या मधोमध सीडी वर्कवरील कॉक्रीट निखळून मोठे भगदाड पडले आहे. गेल्या वर्षभरात दोन वेळा दुरुस्ती करून देखील निकृष्ट बांधकामामुळे आता तिसऱ्यांदा हा प्रकार घडला आहे. सदर रस्ता वर्दळीचा असल्यामुळे रस्त्या मधोमध पडलेले हे मोठे भगदाड़ अपघाताला आमंत्रण देणारे ठरत आहे.
रात्रीच्या वेळी रस्त्यावरील लाईट गेल्यास या ठिकाणी गंभीर स्वरूपाचा अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने लोकप्रतिनिधींसह संबंधित खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन पडलेल्या भगदाडाची तात्काळ दुरुस्ती करून रस्ता पूर्ववत सुरक्षित करावा, अशी जोरदार मागणी स्थानिक नागरिक आणि वाहन चालकांकडून केली जात होती.
यासंदर्भातील सविस्तर वृत्त बुधवारी (दि. २० जुलै) बेळगाव लाइव्हने प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची दखल घेत तातडीने या भगदाडाच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले असून याबाबत नागरीकातून समाधान व्यक्त होत आहे.