सध्या परिस्थिती पाहता आपल्या रहदारी बाबतच्या दृष्टिकोनाचे वर्णन असभ्य, अनुशासित, बेपर्वा आणि निव्वळ मूर्खपणा असे करावे लागेल. रहदारीच्या ठिकाणी आपली नैतिक पातळी आणि दर्जा विसरून सुसंस्कृत लोक ज्या पद्धतीने वागतात ते पाहून अतिशय खेद होतो.
टिळकवाडी पहिल्या रेल्वे गेट येथील उदाहरण घ्यायचे झाल्यास प्रशासनाने या ठिकाणी बॅरिकेड्स घालून स्थानिक रहिवाशांसाठी लक्षणीय गैरसोय करून ठेवली आहे. त्यानंतर आता वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी कॉलेज रोडवरील हॉटेल सन्मान नजीक बॅरिकेड्स घालण्यात आले आहेत. मात्र यामुळे नाईलाजाने यू-टर्न मारावा लागत असल्यामुळे लिंगराज कॉलेजच्या द्वाराच्या ठिकाणी वाहनांची गर्दी होत आहे. त्याचप्रमाणे हलकी वाहने, अवजड वाहने आणि अतिअवजड वाहनांना किल्ला येथील अशोक सर्कलपासून संकम रोडच्या दिशेने जाण्यास निर्बंध घालण्यात आला आहे. त्यामुळे या वाहनांना आता कर्नाटक सर्कल मार्गे राष्ट्रीय महामार्गावर जावे लागत आहे. या उपाय योजनेमुळे दुर्दैवाने रॉंग साईडने वाहने चालवण्याच्या वृत्तीत वाढ होणार आहे.
जी गेल्या बऱ्याच वर्षापूर्वी काँग्रेस रोडवर पहिल्या रेल्वे गेट येथे बॅरिकेड्स घातल्यापासून पहावयास मिळते. यात भर म्हणून सीबीटी नजीक प्रायोगिक तत्त्वावर वन-वे पद्धत अवलंबण्याद्वारे वाहनांना सीबीटीकडून खडेबाजारमध्ये जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. मात्र इतके करून देखील खेदाची बाब म्हणजे रहदारी पोलीस आणि नागरिकांच्या वृत्तीत बदल झालेला नाही.
अनेकदा निषेध व आंदोलने करून देखील रहदारी पोलिसांनी आपला हट्ट न सोडता जनतेला गैरसोयीचे ठरणारे बॅरिकेड्स हटवलेले नाहीत. जर जनतेच्या सुरक्षेसाठी बॅरिकेड्सचा हा नियम केला असेल तर त्याचे पालन होते की नाही हे पाहणे देखील रहदारी पोलिसांचे कर्तव्य आहे. पोलिसांनी बॅरिकेड्स घातलेल्या ठिकाणी कायम थांबणे किंवा किमान रहदारीला शिस्त लागेपर्यंत थांबणे आवश्यक आहे. मात्र दुर्दैवाने तसे न घडता पोलीस त्या ठिकाणाहून गायब होऊन किरकोळ नियम भंगांसाठी वाहनचालकांना वेठीस धरून त्यांच्याकडून दंड वसूल करण्यावर आपले लक्ष केंद्रित करत असतात. पोलिसांच्या या हलगर्जीपणाचा फायदा घेत काँग्रेस रोडवर अनेक वाहनचालक धोकादायकरित्या रॉंग साईडने वाहने हाकताना अथवा दुभाजकावरून रस्ता ओलांडताना पहावयास मिळतात. वाहनचालकांकडून हा जीवघेणा प्रकार केवळ बॅरिकेड्समुळे जादाचे 250 मीटर अंतर पुढे जाऊन वळण घेणे टाळण्यासाठी केला जातो हे थक्क करणारे आहे. ही बेदरकार वागणूक फक्त विशिष्ट लोक करत नाहीत तर तरुणांपासून वयस्करांपर्यंत सुशिक्षित, अशिक्षित सर्वजण रहदारी नियमांचा भंग करण्यात धन्यता मानतात.
हा प्रकार आपल्या समाजाच्या मानसिकतेचे प्रतिबिंब दर्शवितो. आपल्या कृतीचे प्रतिकूल परिणाम लक्षात न घेता स्वतःच्या सोयीसाठी अशा अर्थहीन आणि बेजबाबदार कृतीत आपण गुंतून पडलो आहोत. तुम्ही जर काँग्रेस रोड वरून एका बाजूने जात असाल तर तुम्हाला विभिन्न वाहनांचे चालक रहदारी नियमाचा भंग करताना दिसतील. यामध्ये उच्चभ्रू सुशिक्षित महागड्या गाड्या बाळगणारे लोकही सामील असतात हे विशेष होय. खरंतर या पद्धतीने रहदारी निर्माणचे उल्लंघन हे एखाद्या गंभीर अपघाताला निमंत्रण देणारे आहे. परंतु देव ना करो आणि तसे कांही घडो. मात्र रहदारी नियमांचा भंग करण्याचा प्रकार संबंधित वाहन चालकांची मी का काळजी करावी? सगळेच जण करतात मग मी का नाही? ही मानसिकता दर्शवणारा आहे हे मात्र निश्चित.