Monday, November 25, 2024

/

बेळगाव लाईव्ह इम्पॅक्ट : सावगाव रोडवर बॅरिकेड्स बसविले

 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगावमधील सावगाव रोडवर घालण्यात आलेल्या अशास्त्रीय गतिरोधकामुळे वाहनधारकांचा जीव धोक्यात येत असल्यासंदर्भात बुधवारी (दि.१२) ‘बेळगाव लाईव्ह’ ने वृत्त प्रकाशित केले होते. या वृत्ताची दखल घेत पोलीस उपायुक्त शेखर यांनी ग्रामीण पोलीस स्थानकाला नागरिकांच्या सुरक्षितत्तेसाठी अधिकाधिक प्राधान्य देत बॅरिकेड्स लावण्याची सूचना केली. या सूचनेला अनुसरून तातडीने सावगाव रोडवरील धोकादायक गतिरोधकाजवळ बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत.

अंगडी कॉलेज ऑफ टेक्नॉलॉजी या परिसरात बसविण्यात आलेल्या अशास्त्रीय गतिरोधकामुळे एका तरुणाचा नुकताच अपघात घडला असून येथील गतिरोधक शास्त्रोक्त पद्धतीने बसविले जावेत, अशी मागणी पुढे येत होती.

या मागणीला अनुसरून आज बेळगाव लाईव्ह च्या टीमने थेट सावगाव रोडवरील धोकादायक गतिरोधकावरून प्रक्षेपण करत वृत्त प्रसारित केले होते. या वृत्ताची दखल घेत याठिकाणी बॅरिकेड्स बसविण्यात आले आहेत.

सावगाव रोड हा नानावाडी रोडला जोडला गेला आहे. यामुळे टिळकवाडी मार्गावरून येणाऱ्या वाहनधारकांकडून या मार्गाचा वापर केला जातो. नानावाडी मार्गे अंगडी महाविद्यालयाला येणाऱ्या विद्यार्थ्यांचीही संख्या मोठ्या प्रमाणात आहे. बहुतांशी विद्यार्थी हे विना हेल्मेट प्रवास करतात आणि याचा फटका त्यांना अशा पद्धतीच्या गतिरोधकांमुळे बसत आहे.

एकीकडे वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन आणि दुसरीकडे अशास्त्रीय पद्धतीने बसविण्यात आलेले गतिरोधक, यामुळे वाहनधारकांचा जीव धोक्यात असल्याचे बोलले जात आहे. येथील एक गतिरोधक कालच बसविण्यात आला असून या गतिरोधकामुळे एका तरुणाचा अपघातही घडला आहे. अपघातानंतर आज सकाळी गतिरोधक पांढरे पट्ट्यांनी रंगविण्यात आला असून याठिकाणी आज समाजसेवक संतोष दरेकर यांनी ‘बेळगाव लाईव्ह’टीम सोबत जाऊन पाहणी करत या गतिरोधकांची निर्मिती अशास्त्रीय पद्धतीने झाली असल्याचे सांगितले होते.Barricades

अंगडी महाविद्यालयात येणारे बहुतांशी विद्यार्थी हे या मार्गावर अधिक वेगाने वाहने चालवीत असल्याचेही निदर्शनात आले आहे. या वेगळा आवर घालण्यासाठी आणि नियंत्रण मिळविण्यासाठीच गतिरोधकांची निर्मिती केली जाते. मात्र याठिकाणी निर्माण करण्यात आलेला गतिरोधक हा अशास्त्रीय पद्धतीमुळे जीवघेणा ठरत आहे. याठिकाणी बॅरिकेड्स लावण्यात यावेत, अशी मागणी संतोष दरेकर यांनी बेळगाव लाईव्ह च्या माध्यमातून रहदारी विभागाकडे केली होती.

या परिसरात अनेक हॉटेल्स आहेत. रात्रीच्यावेळी याच मार्गावरून मद्यपींचा वावर अधिक असतो. यामुळे आसपास परिसरात दारूच्या बाटल्यांचा खचही पडलेला दिसून येत आहे. शिवाय या मार्गावर पथदीपअभावी संपूर्ण मार्ग अंधारमय झाला आहे. या मार्गावरून येणाऱ्या वाहतुकधारकांसाठी तसेच या मार्गावरील अपघातांना आळा घालण्यासाठी रहदारी पोलिसांची गस्त वाढविण्यात यावी, पथदीप बसविण्यात यावेत आणि शास्त्रोक्त पद्धतीने गतिरोधक बसविण्यात यावेत, अशी मागणी करण्यात आली होती. या मागण्यांपैकी प्राधान्याने या गतिरोधकाजवळ बॅरिकेड्स लावण्यात आले असून यामुळे समाधान व्यक्त होत आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.