बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहराच्या रहदारीचे तीन तेरा वाजले असतानाच रहदारी पोलीस विभाग नवनव्या कल्पना लढवून नागरिकांच्या डोकेदुखीत भर घालत आहे. शहराच्या रहदारीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.
अनेक ठिकाणी सिग्नल यंत्रणा कार्यान्वित असूनही अपघातांच्या मालिकांमध्ये घट होत नाही. एकीकडे रस्त्यांवरील भले मोठे खड्डे, वाहतूक व्यवस्थेचा उडालेला बोजवारा यासारख्या समस्यांमध्ये रहदारी पोलिसांचा या ना त्या कारणाने सातत्याने नागरिकांना होणारा मनस्ताप आणि त्यातच भर म्हणजे विविध ठिकाणी बॅरिकेट्स घालून नागरिकांना घालावा लागणारा वेढा या साऱ्या समस्या नागरिकांच्या गळ्यापर्यंत आल्याचे चित्र सध्या दसून येत आहे.
आज हॉटेल सन्मान नजीक रहदारी विभागाने बॅरिकेट्स घातले आहेत. यामुळे शहरातील वाहनधारकांना नाहक मनस्ताप सोसावा लागत आहे. काहींनी या गोष्टीचे स्वागत केले आहे पण जसा या बातमीचा फोटो सोशल मीडियावर वायरल झाला तशा नेटकऱ्यांनी विविध कमेंट्स टाकत बेळगावच्या रहदारी नियंत्रणावर ताशेरे ओढले आहेत.
हॉटेल सन्मान नजीक घालण्यात आलेल्या बॅरिकेट्समुळे वाहनधारकांना राणी चन्नम्मा चौकाला वळसा घालावा लागत आहे किंवा लिंगराज महाविद्यालयासमोर असलेल्या चौकातून वळसा घेऊन पुढे मार्गस्थ व्हावे लागत आहे.
शहरात अनेक ठिकाणी वाहतूक मार्गात अशाच पद्धतीने बॅरिकेट्स लावण्यात आले असून टिळकवाडी पहिल्या रेल्वे गेटनजीक लावण्यात आलेल्या बॅरिकेटस साठी येथील नागरिकांनी अनोखे आंदोलन देखील केले होते. रहदारी विभागाने लावलेल्या या बॅरिकेट्समुळे वाहनचालकांना नाहक मनस्ताप सोसावा लागत आहे. टिळकवाडी पहिले रेल्वे गेट, धर्मवीर संभाजी चौक यासह शहरातील प्रमुख मार्गावर अशाच पद्धतीने बॅरिकेट्स लावून रस्ता अडविण्यात आला आहे.
या भागात अनेक शाळा, महाविद्यालये, सरकारी कार्यालये यासह अनेक आस्थापने, खाजगी कार्यालये आहेत. याठिकाणी जाणाऱ्या वाहनचालकांना मोठमोठे वळसे घेऊन आपापल्या नियोजित ठिकाणी जावे लागत आहे.
रहदारी विभागाने अशा पद्धतीने बॅरिकेट्स लावून रस्ते अडविण्या ऐवजी रहदारी नियंत्रण व्यवस्थेत बदल करावा, शाळा, महाविद्यालये यासह गर्दीच्या ठिकाणी रहदारी नियंत्रणासाठी चोख सिग्नल यंत्रणेसह रहदारी पोलीस कर्मचारी नियुक्त करावेत, वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर सक्त कारवाई करावी, ठिकठिकाणची सिग्नल यंत्रणा सुरळीत सुरु ठेवण्याकडे लक्ष् पुरवावे अशा मागण्या नागरीकातून होत आहेत.