बेळगाव लाईव्ह : बेळगाव चोर्ला मार्गावरील पिरनवाडी मुख्य रस्त्यावर मोठा खड्डा पडला असून या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या दुचाकीस्वाराला खड्ड्याचा अंदाज न आल्याने दुचाकीस्वार पडून जखमी झाला आहे.
हि बाब येथील स्थानिक व्यापाऱ्यांच्या लक्षात येताच व्यापाऱ्यांनी या खड्ड्यांच्या भोवती बॅरिकेट्स लावले आहेत. दोन दिवसांपूर्वी झालेल्या अपघाताची पुनरावृत्ती होऊ नये याची खबरदारी घेत व्यापाऱ्यांनी हे बॅरिकेट्स बसविले आहेत.
पिरनवाडी मुख्य रस्त्यावर वारंवार वाहतूक कोंडी होत असून या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अनेक लहान मोठे अपघात देखील घडत आहेत. बेळगावमध्ये विविध ठिकाणी रस्त्यांच्या विकासाच्या नावावर करण्यात आलेली घोकंपट्टी आता पावसात उघड होत असून अशीच परिस्थिती पिरनवाडी रस्त्याचीही झाली आहे.
रस्त्यांवरील अशा खड्ड्यांमुळे एखादा अनुचित प्रकार घडला किंवा जीवितहानी झाली तरच प्रशासनाला जाग येणार आहे का? असा संतप्त सवाल उपस्थित करण्यात येत आहे.