बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहर नेमक्या कोणत्या बाजूने पाहावे म्हणजे ते स्मार्ट दिसेल? असा यक्षप्रश्न सध्या बेळगावकरांमध्ये उपस्थित केला जात आहे. स्मार्ट सिटीच्या नावाखाली गेल्या काही वर्षात बेळगावच्या विकासाच्या ऐवजी बेळगावला भकास करण्यातच धन्यता मानण्यात आली असून संपूर्ण बेळगावमध्ये ज्याज्याठिकाणी स्मार्ट सिटी अंतर्गत विकासकामे करण्यात आली आहेत.
त्याठिकाणी विकासकामांचा बोजवारा उडाल्याचेच चित्र आतापर्यंत दिसून आले आहे. बेळगावमधील रुक्मिणीनगर मध्ये विकासाच्या नावावर समस्यांमध्ये भर घालण्यात आल्याचे चित्र सध्या दिसून येत असून विकासकामांसाठी खोदण्यात आलेल्या रस्त्यांमुळे येथील रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे.
या भागात ड्रेनेज वाहिन्या घालण्याचे कामकाज हाती घेण्यात आले होते. मात्र या कामकाजासाठी रस्त्यांवर खोदकाम करण्यात आले आहे. तसेच सांडपाणी प्रकल्पासाठी पंप हाऊसची निर्मिती देखील करण्याचा प्रस्ताव या भागात आखण्यात आला असून या कामकाजादरम्यान रुक्मिणीनगर स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याची अक्षरशः चाळण उडाली आहे.
ड्रेनेज वाहिन्या घालण्यात आल्यानंतर रस्त्याची डागडुजी करण्याकडे कंत्राटदाराचे साफ दुर्लक्ष झाले असून पावसाला सुरुवात झाल्यामुळे खोदकाम करण्यात आलेल्या रस्त्यांवर चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. गेल्या २ दिवसांपासून पावसाचा जोर काही अंशी वाढल्यामुळे रस्त्यांवरील चिखल मोठ्या प्रमाणात वाहनांच्या माध्यमातून पसरत आहे. यामुळे या भागात याआधीही काही अपघात घडले असून पावसामुळे निर्माण झालेल्या चिखलसदृश्य रस्त्यामुळे अपघातांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत महांतेश नगर, माळ मारुती परिसरात विकास कामे राबविण्यात प्राधान्य देण्यात आले आहे. मात्र, या परिसरात असलेल्या रुक्मिणी नगर स्मशानभूमी कडे जाणाऱ्या रस्त्याकडे मात्र दुर्लक्ष करण्यात आले आहे. येथे निर्माण झालेल्या चिखलामुळे वाहने अडकून पडण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत.
वाहने घसरून वाहनधारकांना दुखापत देखील होण्याचे प्रकार वारंवार घडत असून या भागात विकासकामांसाठी खोदण्यात आलेल्या तरी तातडीने बुजविण्यात याव्यात तसेच रस्त्याची डागडुजी करून नागरिकांची समस्या सोडवावी अशी म्हणी रुक्मिणी नगर भागातील रहिवासी करत आहेत.