बेळगाव लाईव्ह : विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेसच्या हाती सत्तेची सूत्रे आल्यानंतर राज्यभरात सुरुवातीच्या टप्प्यात हमी योजनांच्या पूर्ततेचा धुरळा उडाला. मंत्रिमंडळाची जबाबदारी मिळाल्यानंतर आता हळूहळू मंत्रीमहोदय आपापल्या विभागाच्या विकासासाठी आगेकूच करत असून बेळगावच्या पालकमंत्रीपदी वर्णी लागलेले आमदार सतीश जारकीहोळी यांनी पहिल्या पंधरवड्यातच आपल्या कामाची ‘रफ्तार’ वाढवली आहे.
मंत्रिपदाची सूत्रे हाती आल्यानंतर पहिल्या टप्प्यात महानगरपालिकेत तुडुंब गर्दीत बैठक पार पडली. या बैठकीतच अनेकांना सक्त इशारा पालकमंत्र्यांनी दिला. हळूहळू बेळगावच्या स्मार्ट सिटी कामकाजाबाबत होत असलेल्या तक्रारींचा आढावा घेत मागोमाग सलग बैठका घेण्यात आल्या. शनिवारी (दि. १) स्मार्ट सिटी, वॅक्सीन डेपो आणि बुडा यासंदर्भात विविध विभागाच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर पुन्हा सतीश जारकीहोळी यांनी लगाम खेचले असून उपरोक्त विभागातील राबविण्यात आलेल्या प्रकल्पांसंदर्भात ‘ऍक्शनमोड’वर स्वतःला ‘ऍक्टिव्ह’ केले आहे..!
गेल्या कित्येक महिन्यांपासून बेळगावमध्ये विविध ठिकाणी स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत राबविण्यात आलेल्या योजना, कामकाजांविरोधात नागरिकांच्या अनेक तक्रारी पुढे येत आहेत. बुडामध्ये भ्रष्टाचार झाल्याचे आरोप होत आहेत. नैसर्गिक वारसा लाभलेल्या वॅक्सीन डेपोमध्ये बेकायदेशीर रित्या कामकाज सुरु असल्याच्याही तक्रारी पुढे येत आहेत. शहर परिसरात स्मार्ट सिटी कामकाज राबविण्यासाठी झाडांची कत्तल, दर्जाहीन कामकाज, घोटाळा, अफाट खर्च अशा अनेक तक्रारी पुढे आल्या असून या सर्व तक्रारींची शहानिशा करण्याचा निर्णय सतीश जारकीहोळी यांनी घेतला असून यासंदर्भात आता चौकशी करण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत.
सातत्याने पुढे येत असलेल्या तक्रारींबाबत सतीश जारकीहोळी आक्रमक झाले असून आता जनतेचा त्रास कसा कमी होईल, याकडे आपला कल असेल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. बहुचर्चित बुडा घोटाळ्याप्रकरणी मागील आठवड्यात तक्रार नोंदविण्यात आली असून बुडा आयुक्तांची चौकशीही होणार आहे. या सर्व विभागातील तक्रारी पालकमंत्र्यांनी गांभीर्याने घेतल्या असून बेळगावमध्ये विविध ठिकाणी होणाऱ्या फ्लायओव्हर संदर्भातही त्यांनी सकारात्मक पद्धतीने काम सुरु करण्यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत. बेळगावच्या वाहतुकीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मागील बैठकीत फ्लाय ओव्हरचा घेण्यात आलेला निर्णय याबाबत दिल्ली मुक्कामी केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन प्रस्ताव मांडण्यात येणार असल्याचेही जारकीहोळी यांनी स्पष्ट केले आहे. यामुळे बेळगावमधील फ्लाय ओव्हर्सची संख्या वाढणार यात शंका नाही.
भाजप कार्यकाळात झालेल्या कामांवर सतीश जारकीहोळी यांनी अप्रत्यक्षरीत्या ताशेरे ओढले असून बेळगावच्या विकासाची सूत्रे आपल्या हाती घेतल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. निवडणुका जवळ आल्यानंतर तसेच निवडणूक झाल्यानंतर जनतेला अनेक स्वप्ने दाखविली जातात, अनेक आश्वासने दिली जातात. राजकारण्यांच्या, नेत्यांच्या, मंत्रीमहोदयांच्या आशेवर जनता अनेक स्वप्नांचे पूल बांधते. मात्र बहुतांश वेळा जनतेच्या पदरी निराशाच पडते. सत्तेची सूत्रे हाती आल्यानंतर सतीश जारकीहोळी यांनीही बेळगावकरांच्या आशा पल्लवित केल्या असून पहिल्या पंधरवड्यात जो जोम त्यांनी दाखविला आहे, त्याच जोमाने बेळगावचा विकास पूर्णत्वास न्यावा, अशी आशा बेळगावकर व्यक्त करत आहेत.