बेळगाव शहर आणि ग्रामीण भागात आज शनिवारी सुहासिनी महिलांकडून वटवृक्षांचे पूजन करण्याद्वारे वटपौर्णिमा पारंपारिक पद्धतीने मोठ्या भक्तीभावाने साजरी केली जात आहे.
वटपौर्णिमेला आज शनिवारी सकाळी 11:17 वाजता प्रारंभ झाला असून उद्या रविवारी सकाळी 9:11 वाजेपर्यंत पौर्णिमेचा कार्यकाळ असेल. वटवृक्षाच्या पूजेसाठी आज शनिवारी सायंकाळी 5:45 पर्यंत मुहूर्त आहे.
वटपौर्णिमेनिमित्त सुहासिनी महिला पारंपारिक पद्धतीने वडाच्या झाडाचे भक्ती भावाने पूजन करण्याबरोबरच झाडा सभोवती प्रदक्षिणा घालत त्याला सुताचा धागा बांधतात. हे करताना आपल्या पतीच्या सुख समृद्धी व दीर्घायुष्यासाठी तसेच हा पती सात जन्म मिळावा, अशी प्रार्थना केली जाते. त्यामुळे आज वटपौर्णिमा दिवशी शहर उपनगरासह ग्रामीण भागात असलेल्या वटवृक्षांच्या ठिकाणी सुहासिनी महिलांची वटपूजेसाठी गर्दी झाल्याचे पहावयास मिळत आहे.
बहुतांश महिलांनी वटवृक्ष पूजेच्या निमित्ताने आवश्यक असणारे पूजा साहित्य काल शुक्रवारीच खरेदी केले असले तरी आज देखील बाजारात बांगड्या, दोरा, कंगवा, मणी व हळद-कुंकू यांचा समावेश असलेले सौभाग्यवाण, जांभूळ, धामणं, आंबे, केळी विक्रीसाठी उपलब्ध होते.
ग्रामीण भागात वटवृक्षाच्या पूजनाबरोबर वृषभांची अर्थात बैलांची देखील पूजा केली जाते. तसेच दुसऱ्या दिवशी हौसेने सजवून त्या बैलांची मिरवणूक काढली जाते.
ज्याला कर्नाटकात बेंदूर असे म्हंटले जाते. अन्नदात्या शेतकऱ्यांबरोबर शेतात वर्षभर काबाडकष्ट करणाऱ्या बैलांप्रती आदर व्यक्त करण्याचा हा दिवस महाराष्ट्रात पोळा म्हणून साजरा होतो.