बेळगावात पावसाने दडी मारल्याने लोकांना शाळेत घरात पाणी टंचाई भासू लागली आहे मान्सून लांबल्याने उपनगरात पाणी समस्या तीव्र बनली आहे. पिण्याचे पाणी मिळत नसल्याने अनेक नागरिक टँकरवर विसंबून आहेत. टंचाई काळात खासगी कूपनलिका, विहिरीतील पाणी त्या त्या गल्लीतील नागरिकांना उपलब्ध करुन दिल्यास पाणीटंचाईची झळ कमी होण्यास मदत होणार आहे. यासाठी प्रशासनाच्या पुढाकाराची गरज असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
जून महिन्यातील पंधरवडा कोरडा गेल्यानंतर नागरिकांसह प्रशासनाचीही झोप उडाली आहे. रोज टँकरची मागणी वाढत असून अनेक नागरिक टँकरचे पाणी विकत घेत आहेत. आणखी पंधरा दिवस पाऊस न पडल्यास गंभीर स्थिती उद्भवणार आहे. या परिस्थितीत खासगी कूपनलिका, विहिरींतील पाणी त्याच ठिकाणी उपलब्ध करुन दिल्यास त्रास कमी होणार आहेत.
गल्लीतील सर्व कूपनलिका आणि विहिरीतील पाणी एका टाकीत साठवले तर सर्वांना पाणी मिळेल. मात्र कूपनलिका किंवा विहिर मालकांना वीज बिलात सवलत देण्याची गरज आहे. शासनाने नवीन कूपनलिकांवर खर्च करण्यापेक्षा हा उपक्रम राबवावा अशी भूमिका फेसबुक फ्रेंड्स सर्कल अध्यक्ष संतोष दरेकर यांनी दिली आहे.
खासगी मालकीच्या कूपनलिका किंवा विहिरी आहेत. येथील पाणी गल्लीतील नागरिकांना देण्यासाठी प्रशासनाने गल्लीत किमान पाच हजार लिटर क्षतमेची टाकी उपलब्ध करुन द्यावी. या टाकीत गल्लीत उपलब्ध असलेल्या कूपनलिका किंवा विहिरींचे पाणी जमा करावे.
तेच पाणी गल्लीतील नागरिकांना पुरवल्यास खर्चाची बचत होणार आहे. यासाठी शासनाने वीज बिलात सवलत देऊन कूपनलिका, विहिर मालकांना आपल्यासमवेत घ्यावे, असे आवाहन शहरातील सामाजिक संस्थांनी केले आहे.