बेळगाव लाईव्ह : राज्यातील सरकारी प्राथमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमधील ५८००० शिक्षकांच्या रिक्त पदांवर लवकरच भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे, अशी माहिती शालेय शिक्षण आणि साक्षरता मंत्री मधु बंगारप्पा यांनी दिली.
बेंगळुरू येथे पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, शिक्षक हे शिक्षण विभागाचे बलस्थान असून, अतिथी शिक्षकांना रिक्त पदांवर नियुक्त करणे हा तात्पुरता उपाय आहे.
लवकरच राज्यातील सरकारी शाळांमधील रिक्त पदे भरण्यासाठी कार्यवाही केली जाणार असून प्राथमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षकांची ५८ हजार रिक्त पदे टप्प्याटप्प्याने भरण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मागच्या सरकारच्या काळात १३३५१ उमेदवारांची अंतिम निवड यादी प्रसिद्ध झाली होती, मात्र त्यातील काहींनी न्यायालयात धाव घेतल्याने जागा वाटपाचा आदेश लांबला होता. याप्रकरणी कायदेशीर मदत घेऊन लवकरच भरती प्रक्रिया पूर्ण केली जाईल, असे बंगारप्पा म्हणाले.