बेळगाव शहराच्या रिंग रोडसाठी सुपीक शेत जमीन संपादन करण्यास शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे. त्या अनुषंगाने रिंग रोडसाठी सर्वेक्षण करण्यास आलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पथकाला शेतकऱ्यांनी विरोध करून माघारी पिटाळून लावल्याची घटना आज दुपारी गोजगा (ता. जि. बेळगाव) येथे घडली
जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या पुढाकाराने बेळगाव शहरात फ्लाय ओव्हर ब्रिज बांधण्याच्या दृष्टिकोनातून तयारी सुरू करण्यात आली आहे. मात्र दुसरीकडे शहराच्या रिंग रोडसाठी सर्वेक्षण आणि मोजमाप करण्याचे काम पुन्हा सुरू झाले आहे.
गोजगा गावाच्या ठिकाणी दाखल झालेल्या संबंधित खात्याचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आज दुपारी तेथील आंबेवाडी ग्रा. पं. अध्यक्ष चेतन पाटील यांच्या शेतात उपकरणे मांडून सर्वेक्षणाची तयारी सुरू केली होती. मात्र तेथे पेरणीसाठी उपस्थित असलेल्या चेतन पाटील यांच्यासह कांतेश चलवेटकर व मारुती नाईक यांनी त्यांना तीव्र विरोध केला.
त्यावेळी सर्वेक्षणासाठी आलेल्यांनी आम्ही फक्त आदेशाचे पालन करतो असे सांगून आपल्या वरिष्ठांकडे बोट दाखवले. तेंव्हा ग्रा. पं. अध्यक्ष चेतन पाटील यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून बेळगाव रिंग रोडचा वाद न्यायप्रविष्ठ असताना तुम्ही सर्वेक्षण कसे काय करू शकता? असा जाब विचारला.
चेतन पाटील यांच्याशी फोनवर बोलणाऱ्या अधिकाऱ्याने स्वतः तुमच्या गावातील लोकांनी सर्वेक्षणास परवानगी दिल्याचे सांगितले. मात्र संतप्त चेतन पाटील यांनी तुम्हाला कोणी परवानगी दिली त्याला आमच्या समोर आणा असे आव्हान देताच त्या अधिकाऱ्याने नमते घेऊन तुमचे शेत सोडून आम्ही दुसरीकडे सर्वेक्षण करतो असे सांगितले. तेंव्हा या भागातल्या कोणत्याच शेतात सर्वेक्षण होणार नाही.
तुम्ही येथून चालते व्हा, असे चेतन पाटील यांनी त्या अधिकाऱ्याला बजावले. त्यानंतर चेतन पाटील, कांतेश चलवेटकर, मारुती नाईक आणि अन्य शेतकऱ्यांनी रिंग रोड सर्वेक्षणास आलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या पथकाला गावातून हुसकावून लावले.