Sunday, December 1, 2024

/

कंग्राळ गल्ली, गांधीनगरतर्फे पावसासाठी गाऱ्हाणे

 belgaum

प्रलंबित मान्सूनचे त्वरेने आगमन होऊन बेळगाव शहर आणि परिसरात मुबलक पाऊस पडून पाण्याची समस्या दूर व्हावी, या मागणीसाठी कंग्राळ गल्ली आणि जुने गांधीनगर येथील पंचमंडळी व नागरिकांच्यावतीने ग्रामदैवत श्री धुपटेश्वर देवाला गाऱ्हाणे घालण्याचा कार्यक्रम आज सोमवारी भक्तीभावाने पार पडला.

सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून महापौर शोभा सोमनाचे उपमहापौर रेश्मा पाटील आणि माजी आमदार ॲड. अनिल बेनके उपस्थित होते. या मान्यवरांसह बेळगाव देवस्थान कमिटीचे अध्यक्ष रणजीत चव्हाण -पाटील, माजी महापौर मालोजीराव अष्टेकर, प्राचार्य आनंद आपटेकर, नगरसेवक शंकर पाटील आदींसह पंच मंडळींच्या उपस्थितीत ग्रामदैवत श्री धुपटेश्वर देवाला परंपरेनुसार विधिवत गाऱ्हाणे घालण्यात आले.

यावेळी हर हर महादेव, जोतिबाच्या नावाने चांगभलं, धुपटेश्वरच्या नावाने चांगभलं, बम बम भोले असा जयजयकार करण्यात येत होता. परंपरेनुसार सदर गाऱ्हाणे कार्यक्रमानंतर बैल पळवण्याचा कार्यक्रमही झाला.

प्रारंभी माजी महापौर मालोजीराव अष्टेकर यांनी उपस्थित यांचे स्वागत करून प्रास्ताविकात कंग्राळ गल्ली आणि जुने गांधीनगरतर्फे दरवर्षी आयोजित केल्या जाणाऱ्या आजच्या गाऱ्हाणे कार्यक्रमाची माहिती दिली.

यावेळी बोलताना महापौर शोभा सोमनाचे यांनी आजच्या या गाऱ्हाणे कार्यक्रमामुळे पावसाचे लगेच आगमन होऊन बळीराजा आणि समस्त शहरवासीयांची पाण्याची समस्या दूर होईल असा विश्वास व्यक्त केला. देवस्थान कमिटीचे अध्यक्ष माजी नगरसेवक रणजीत चव्हाण -पाटील यांनी गाऱ्हाणे कार्यक्रम आणि त्यातील देवस्थान कमिटीच्या सहभागाबद्दल थोडक्यात माहिती दिली. तसेच परंपरेनुसार बैल पळवण्याच्या कार्यक्रमासाठी असणाऱ्या खुल्या जागेवर अतिक्रमण होणार नाही याची दक्षता घेतली जावी. याकडे माजी आमदार ॲड. बेनके यांच्यासह प्रामुख्याने महापौर आणि उपमहापौर यांनी लक्ष देऊन योग्य ती कार्यवाही करावी अशी विनंती केली. तसेच संबंधित जागेत पैसा व सत्तेचा वापर करून अतिक्रमण झाल्यास ते कदापि खपवून घेतले जाणार नाही, असे स्पष्ट केले.Kangral galli prayer

माजी आमदार ॲड. अनिल बेनके यांनी यावेळी बोलताना दरवर्षी कंग्राळ गल्लीतर्फे बेळगाव शहरासाठी श्री धुपटेश्वर प्रसन्न या देवस्थानाकडे ही पावसासाठी प्रार्थना केली जाते. गेली 20 -25 वर्षे मी या पूजेला हजेरी लावत आहे असे सांगितले. ही एक हिंदू परंपरा असून आजवरचा माझा आणि येथे उपस्थित ज्येष्ठ अनुभवी नागरिकांचा अनुभव लक्षात घेता या गाऱ्हाणे कार्यक्रमानंतर पावसाला निश्चितपणे प्रारंभ होत असतो. पहा आज या कार्यक्रमावेळीच पाऊस होत आहे.

तेंव्हा उद्यापासून मुबलक पाऊस पडणार हे नक्की आहे. कंग्राळ गल्लीतर्फे संपूर्ण बेळगाव शहरासाठी पावसाची प्रार्थना केली जाते हे विशेष होय असे सांगून यावेळीही शेतकरी आणि शहरवासीयांना मुबलक पाणी उपलब्ध होण्यासाठी चांगला पाऊस पडू दे. ही माझी ईश्वरचरणी प्रार्थना आहे, असे आमदार ॲड. बेनके शेवटी म्हणाले. याप्रसंगी कंग्राळ गल्ली आणि जुने गांधीनगर येथील पंचमंडळींसह बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.