राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची 400 कोटी रुपये इतकी ऊस बिले प्रलंबित आहेत ती त्वरेने पुढील हंगामापूर्वी अदा केली जातील तसेच बेळगाव जिल्ह्यातील उसाची प्रलंबित बिले येत्या पंधरा दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होतील, अशी माहिती राज्याचे ऊस विकास आणि साखर संचलनालय खात्याचे मंत्री शिवानंद पाटील यांनी दिली.
शहरातील गणेशपुर रोड येथील एस. निजलिंगप्पा साखर संस्थेला आज बुधवारी सकाळी दिलेल्या भेटीप्रसंगी ते पत्रकारांशी बोलत होते. साखर उद्योग वाढत आहे. नवनवे शोध लागत आहेत. त्यानुसार नवी धोरण अस्तित्वात येत आहेत. त्यामुळे फक्त साखर उत्पादनाबद्दल बोलणे योग्य नाही इथेनॉल सारख्या इतर उपउत्पादनांनाही महत्त्व दिले पाहिजे.
या संस्थेचा अधिक विकास व्हावा आणि त्याचा या भागातील शेतकरी आणि जनतेला लाभ व्हावा यासाठी मी प्रयत्नशील राहणार आहे. राज्यातील शेतकऱ्यांची 400 कोटी रुपये इतकी उसाची बिले प्रलंबित आहेत ती बिले येत्या हंगामापूर्वी अदा केली जातील. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या उसाची बिले त्वरित मिळालीच पाहिजेत असे स्पष्ट करून मंत्री शिवानंद पाटील यांनी राज्यातील साखर कारखान्यांची बैठक घेऊन विविध तक्रारी आणि समस्यांचे निवारण केले जाईल असे सांगितले. तसेच साखर उद्योगाच्या बाबतीतील सरकारचे धोरण, इथेनॉलचे उत्पादन वगैरे गोष्टींची माहिती देण्याबरोबरच मंत्र्यांनी साखर उद्योगा संदर्भातील पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देऊन त्यांच्या शंकांचे निरसन केले.
गणेशपुर रोड येथील एस. निजलिंगप्पा साखर संस्थेला दिलेल्या भेटी प्रसंगी मंत्री शिवानंद पाटील यांनी संस्थेच्या प्रयोगशाळेला भेट देऊन तेथील कामकाजाची आणि उपकरणांची इत्यंभूत माहिती घेतली. यावेळी संस्थेच्या तज्ञांनी भिंतीवरील चार्टवर काढण्यात आलेल्या आकृतीच्या माध्यमातून मंत्री महोदयांना फर्मेंटेशनसह इथेल अल्कोहोल, अल्कोहोल, इथेनॉल, रेक्टिफाइड स्पिरिट आदींच्या निर्मितीची माहिती दिली.
यावेळी मंत्री पाटील यांनी त्या अधिकाऱ्यांकडून आपल्या शंकांचे निरसन करून घेतले. याप्रसंगी एस. निजलिंगप्पा साखर संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक, संचालक, साखर खात्याचे वरिष्ठ अधिकारी आणि शेतकरी बांधव उपस्थित होते.