सरकारने राज्यभरात महिलांना जशी मोफत बस सेवेची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. तशी सवलत सर्व्हिस बस धारकांना देखील द्यावी. त्यांचा सर्व्हिस पास दर कमी करावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते प्रसाद चौगुले यांनी केली आहे.
राज्य सरकारने महिलांसाठी राज्यभर मोफत बस प्रवासाची सुविधा दिली आहे. बहुतांश पुरुष मंडळींना नोकरीसाठी दररोज बसने प्रवास करावा लागतो. यासाठी त्यांनी सर्व्हिस बस पास काढलेला असतो.
उदाहरणार्थ बेळगाव ते निपाणी प्रवासासाठी सर्व्हिस बस पासची रक्कम दरमहा 1400 रुपये आहे. मात्र सरकारने महिलांसाठी मोफत बस प्रवास योजना अंमलात आणताच बसमध्ये महिलांची एकच गर्दी होत आहे.
परिणामी महिलांनी सर्व आसने बळकवल्यामुळे सर्व्हिस पासधारकांवर बस मधून उभ्याने प्रवास करण्याची वेळ येत आहे.
तेंव्हा याची दखल घेऊन सरकारने किमान बस पासचा दर कमी करून सर्व्हिस बस पासधारकांनाही थोडा दिलासा देणे अपेक्षित आहे, असे सामाजिक कार्यकर्ते प्रसाद चौगुले यांच्यासह अन्य नोकरदारांचे म्हणणे आहे.