बेळगाव लाईव्ह : बेळगावसह संपूर्ण राज्यात आजपासून शाळांना रीतसर सुरुवात झाली असून शाळा परिसरात विद्यार्थ्यांचा पुन्हा किलबिलाट सुरु झाला आहे.
मागील वर्षीपासून मे अखेरीस शाळा सुरू केल्या जात असून यंदाच्या शैक्षणिक वर्षासाठी २९ मे पासून शाळांना प्रारंभ करण्यात आला आहे. काही खाजगी शाळांत २९ मे पासून विद्यार्थ्यांचे स्वागत करून वर्ग सुरु करण्यात आले तर उर्वरित शाळांत आजपासून वर्ग सुरु करण्यात आले आहेत. रवीवारपासूनच पालकवर्ग विद्यार्थ्यांचे शालोपयोगी साहित्य खरेदी करण्यास सुरुवात केली असून बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी होताना दिसत आहे.
आज सकाळपासून शाळेतील वर्गात वेळेवर हजेरी लावण्यासाठी विद्यार्थी-विद्यार्थिनींची लगबग सुरू होती. लहान मुलांचा अपवाद वगळता प्रत्येक विद्यार्थी विद्यार्थिनी शाळेला जाण्यासाठी उत्सुक दिसत होता. त्यामुळे शहरातील शाळांकडे जाणाऱ्या रस्त्यांवर मुलामुलींची गर्दी पहावयास मिळत होती.
शैक्षणिक वर्षाचा पहिला दिवस असल्यामुळे प्रत्येक शिक्षण संस्था शाळा सुरू करण्यासाठी सज्ज झाल्या होत्या. शिक्षक वर्ग तर २९ तारखेपासूनच शाळेत दाखल झाला होता. शाळा सुरु होण्यापूर्वी शाळांची स्वच्छता करण्यात आली, त्याचप्रमाणे बऱ्याच शाळांमध्ये एसडीएमसी अर्थात शाळा सुधारणा समिती व पालकांची बैठक घेण्यात आली.
शैक्षणिक वर्षाचा पहिला दिवस असल्यामुळे आज अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी तोरणे बांधण्याबरोबरच कांही शाळांमध्ये प्रवेशद्वारावर आकर्षक अशा फुलांची सजावट करण्यात आली होती. प्रत्येक शाळेत शिक्षकवर्ग विद्यार्थी-विद्यार्थिनींचे सुहास्यवदनाने आणि उत्स्फूर्त स्वागत करताना दिसत होता.
वार्षिक परीक्षेच्या सुट्टीनंतर आपला मित्र-मैत्रिणींचा गट पुन्हा एकत्र येणार असल्यामुळे विद्यार्थी-विद्यार्थिनींचा चेहऱ्यावर आनंद दिसत होता. पहिला दिवस असल्यामुळे बरेच पालक आपल्या मुलांना शाळेला सोडण्यासाठी आलेले चित्रही दिसून आले.