भरधाव दुचाकी व टेंपोमध्ये झालेल्या भीषण रस्ता अपघातात दुचाकीवरील एकाच गावातील तिघे युवक जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना चिक्कोडी तालुक्यातील बसवनाळगड्डे येथे मंगळवारी रात्री उशिरा घडली.
केरूर गावचे प्रशांत भैरू खोत (वय 33), सतीश कलाप्पा हिरेकोडी (वय 32) आणि यलगौडा चंद्रकांत पाटील (वय 33) अशी अपघातात ठार झालेल्या दुर्दैवी युवकांची नावे आहेत. सदर युवक दुचाकी वरून चिक्कोडीकडून केरूर गावाकडे निघाले होते.
तेंव्हा चिक्कोडी -अंकली रस्त्यावरील बसवनाळगड्डे नजीक टेंपो व दुचाकीत भीषण अपघात झाला. अपघातात दुचाकीवरील दोघे जण जागीच ठार झाले, तर एकजण इस्पितळात घेऊन जात असताना वाटेतच मृत्यू पावला.
अपघाताची माहिती मिळताच चिक्कोडी रहदारी पोलीस स्थानकाचे पीएसआय अमिनभावी यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. याप्रकरणी चिक्कोडी रहदारी पोलिस स्थानकात गुन्हा नोंद झाला आहे. सदर घटनेबद्दल केरुर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.