बेळगाव लाईव्ह : शुक्रवारी सुवर्ण विधान सौध येथे जिल्हाधिकारी आणि इतर विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत महसूल विभागाची बैठक बोलाविण्यात आली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी महसूलमंत्री कृष्णा भैरेगौडा होते.
यावेळी अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना महसूलमंत्री कृष्णा भैरेगौडा म्हणाले, शासनाच्या प्रशासकीय व्यवस्थेत सकारात्मक बदल घडवून आणून सुशासन देण्यास आमचे प्राधान्य आहे. शासकीय कार्यक्रमांच्या अंमलबजावणीत महसूल विभागाची मोठी जबाबदारी असते. या सर्वांबरोबरच महसूल विभागाच्या कामात अडथळा येऊ नये अशा पद्धतीने अधिकाऱ्यांनी काम करावे, असा सल्ला त्यांनी दिला. ते पुढे म्हणाले, महसूल विभागाच्या कामकाजावर सरकारचे चांगले नाव अवलंबून असते. त्यामुळे सर्वांनी सुशासन देण्यासाठी काम केले पाहिजे.
सार्वजनिक योजनांच्या अंमलबजावणीत अधिकाऱ्यांची भूमिका विशेषतः महसूल विभागाची भूमिका महत्त्वाची असते. त्यामुळे जनतेच्या हिताची कामे करण्यासाठी सरकारला सहकार्य करावे, सुशासनाच्या दिशेने सर्वांनी कार्यक्षमतेने काम केले पाहिजे, असे मत मंत्री कृष्णा भैरेगौडा यांनी व्यक्त केले.
जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी, पूर किंवा अन्य आपत्तीच्या परिस्थितीत आपत्कालीन कामे करण्यासाठी आणि जीवितहानी झाल्यास संबंधित कुटुंबांना भरपाई देण्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध असल्याचे स्पष्ट केले. बेळगाव विभागातील सात जिल्ह्यांच्या संदर्भात महसूल विभागाच्या प्रगतीची माहिती त्यांनी बैठकीत दिली.
या बैठकीला महसूल विभागाचे प्रधान सचिव राजेंद्रकुमार कथारिया, नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक आयुक्त डॉ. बी.आर. ममता, भूमापन व भूमि अभिलेख आयुक्त सी.एन.श्रीधर आदींसह बेळगाव, बागलकोट, धारवाड, गदग, हावेरी, उत्तरा कन्नड आणि विजयपूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, कृषी विभागाचे सहसंचालक, जिल्हा निबंधक, तहसीलदार, भूमी अभिलेख विभागाचे उपसंचालक उपस्थित होते.