बेळगाव लाईव्ह : कर्नाटकात सत्तेवर आलेल्या नव्या काँग्रेस सरकारने पाच हमी योजनांच्या पूर्ततेसाठी सपाटा लावला असून हमी योजनांचा लाभ घेण्यासाठी नागरिकांची धडपड सुरु झाली आहे. सरकारने जाहीर केलेल्या गृहज्योती योजनेसाठी काल (रविवारी) पहिल्या दिवसाअखेर राज्यभरात एकूण ५५००० लाभार्थींनी नांव नोंदणी केली आहे.
गृहज्योति योजनेसाठी ऑनलाईन आणि ऑफलाइन द्वारे अर्ज दाखल करण्याची मुभा देण्यात आली असून या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या लाभार्थीना सेवा सिंधू पोर्टल मधील खास डिझाईन केलेल्या वेब पेजवर लॉगिन करावे लागणार आहे.
सिंधू पोर्टल मधील खास डिझाईन केलेल्या वेब पेजवर पहिल्या दिवशी राज्यातील ५५ हजार ग्राहकांची नोंदणी पूर्ण झाली आहे. जास्तीत जास्त लाभार्थींना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी रविवारी सुट्टी दिवशी देखील नांव नोंदणी प्रक्रिया सुरू राहणार आहे.
दरम्यान, गृहज्योती योजनेसाठी अर्ज करण्यास सुरुवात झाल्यानंतर सेवा सिंधू पोर्टलवर कोणतीही माहिती समाविष्ट करण्यात अनेक अडचणी निर्माण झालेल्या पाहायला मिळत असून दिलेल्या लिंकवर ग्राहक क्रमांक घालतेवेळी अनेक अडचणी येत असल्याची तक्रार नागरीकातून होत आहे.
मागील महिन्याचे वाढीव बिल चालू महिन्यात आल्याने अनेक नागरिकांना हे बिल भरायचे कि नाही असाही प्रश्न पडला असून येत्या महिन्यात गृहज्योती अंतर्गत २०० युनिट मोफत वीज मिळविण्यासाठी ऑनलाईन केंद्रांवर नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.