बेळगाव शहराला एकीकडे पाणीटंचाईचा सामना करावा लागत असताना दुसरीकडे शहरातील कांही स्विमिंग पूल अद्यापही पूर्ण क्षमतेने सुरू असल्यामुळे नागरिकात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. तसेच ही स्विमिंग पूल्स तूर्तास कांही दिवस बंद ठेवून त्यांचे पाणी लोकांना पिण्यासाठी किंवा वापरण्यासाठी द्यावे, अशी जोरदार मागणी केली जात आहे.
सध्या पाण्याच्या टंचाईमुळे शहरातील लोकांची मोठी परवड सुरू आहे. मात्र दुसरीकडे शहरातील स्विमिंग पूल्स मात्र पूर्ण भरात सुरू आहेत. असंख्य नागरिक व मुले पोहण्यास येत असल्यामुळे या स्विमिंग पूल्सचे पाणी रोजच्या रोज बदलले जाते. परिणामी यासाठी दररोज शेकडो गॅलन पाण्याचा वापर केला जातो. सध्याच्या पाणी टंचाईच्या काळातही कांही स्विमिंग पूलवर भरपूर पाणीपुरवठा केला जात आहे.
इतर वेळी ही बाब दुर्लक्षण्याजोगी असली तरी सध्याची पाणीटंचाई लक्षात घेता पोहणे महत्त्वाचे की जगण्यासाठी पाणी महत्त्वाचे? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
तसेच स्विमिंग पूलला पुरवले जाणारे पाणी नागरिकांना पुरवले तर पाण्याची समस्या काही अंशी कमी होईल असे मत व्यक्त केले जात आहे. तरी जिल्हा प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेऊन संबंधितांना सूचना कराव्यात आणि कांही दिवस स्विमिंग पूल बंद ठेवून ते पाणी पिण्यासाठी किंवा वापरण्यासाठी द्यावे अशी मागणी केली जात आहे.