आलेला पैसा खर्च कसा करायचा आणि त्यातून मलिदा कसा खायचा एवढंच काय ते काम बेळगाव स्मार्ट सिटीच्या माध्यमातून केला जात असल्याचा सार्वजनिकांचा गंभीर आरोप आहे. शहराची परिस्थितीही या आरोपात तथ्य असल्याचे दर्शवते. धर्मवीर संभाजी चौकातील पिण्याच्या पाण्याचा निष्क्रिय आरओ प्लांट हे त्याचे आणखी एक उदाहरण आहे.
स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत शहरातील धर्मवीर संभाजी चौकात जनतेची तहान भागविण्यासाठी पिण्याच्या पाण्याचा आरओ प्लांट अर्थात प्रकल्प उभारण्यात आला आहे. मात्र हा प्रकल्प उभारण्यात आल्यानंतर त्याच्या देखभालीकडे साफ दुर्लक्ष झाले आहे. परिणामी ज्या उद्देशाने या प्रकल्पावर लाखो रुपये खर्च करण्यात आले होते ते सर्व पैसे पाण्यात गेले आहेत. कुचकामी असलेला या आरओ प्लांटची अवस्था सध्याच्या घडीला असून अडचण नसून खोळंबा अशी झाली आहे. केंद्राकडून कोट्यावधी रुपयांचा निधी स्मार्ट सिटीसाठी पुरवण्यात आला आहे. त्याचा विनियोग योग्य पद्धतीने करून कशा तऱ्हेने आपण आपल्या शहराचा कायापालट करू शकतो. शहराला स्वच्छ सुंदर करू शकतो, हे चंदीगडसह देशातील अन्य शहरांनी दाखवून दिले आहे.
बेळगावात मात्र या उलट चित्र असून केंद्राकडून आलेला पैसा स्मार्ट सिटी योजनेच्या माध्यमातून कसा खर्च करायचा आणि त्यातून मलिदा कसा खायचा एवढेच काम येथील कांही लोकप्रतिनिधी आणि अधिकारी संगनमताने करत आहेत. परिणामी प्रत्यक्षात शहराची आधुनिक पद्धतीने सुधारणा होण्याऐवजी बहुतांश भागांची दुरवस्था झाली आहे. धर्मवीर संभाजी चौकातील निष्क्रिय आरओ प्लांट जनतेची तहान तर भागवतच नाही, उलट या महत्त्वाच्या चौकातील जागा मात्र त्यामुळे अडवली गेली आहे.
सदर आरओ प्लांट सारखीच अवस्था शहरातील ठिकठिकाणच्या सार्वजनिक स्वच्छतागृह आणि मुताऱ्यांची आहे. देखभालीकडे दुर्लक्ष झाल्यामुळे बहुतांश पब्लिक टॉयलेट धुळखात पडून आहेत. तेंव्हा लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तात्काळ योग्य ती कार्यवाही करावी आणि जनतेचा दुवा घ्यावा, अशी जोरदार मागणी केली जात आहे.