बेळगाव लाईव्ह : बेळगाव महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने आज सिव्हिल हॉस्पिटल रोडवर अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेतली होती. या मोहिमे अंतर्गत सिव्हिल हॉस्पिटल रोडवरील अतिक्रमित खोकी हटवून जप्त केली.
मनपा आरोग्याधिकारी डॉ. संजय डुमगोळ यांच्या सूचनेनुसार हाती घेण्यात आलेल्या कारवाईत जिल्हा रुग्णालय ते एपीएमसी सर्कलपर्यंतची सर्व बेकायदेशीर खोकी हटविण्यात आली. सदर कारवाई पोलीस बंदोबस्तात पार पाडण्यात आली.
तसेच या मार्गावर पुन्हा अशा पद्धतीने बेकायदेशीर रित्या अतिक्रमण करण्यात आल्यास दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला.
बेळगाव शहरात चोहोबाजूंनी रहदारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यादरम्यान प्रत्येक मार्गावर रस्त्यावरील विक्रेते आणि फेरीवाल्यांची संख्यादेखील वाढलेली दिसून येत असून यामुळे रहदारीला अडथळा निर्माण होत आहे. मनपा अतिक्रमण हटाव पथकाकडून अनेकवेळा सूचना देऊनही याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. यामुळे आज मनपा अतिक्रमण हटाव पथकाच्या कर्मचाऱ्यांनी अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेत कारवाई केली. या ठिकाणी पुन्हा बेकायदा व्यवसाय केल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.
वाहतुकीला अडथळा ठरणार्या बेकायदा व्यवसायिकांवर कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे कोणीही रस्त्यात अतिक्रमण करू नये, अशा सूचना महापालिकेकडून करण्यात आल्या आहेत.
आज सिव्हिल हॉस्पिटल रोड वर हाती घेण्यात आलेल्या या मोहिमेनंतर शहरात इतर ठिकाणीही अशी मोहीम राबवावी, अशी मागणी होत आहे.