बेळगाव लाईव्ह : बेळगावमधील श्रीनगर गार्डन परिसरात असलेल्या उड्डाणपुलाखाली डॉ. उमेश रोहिल्ला नामक व्यक्ती बेघर असल्याचे काही नागरिकांच्या निदर्शनात आले. सदर व्यक्तीला स्मृतिभ्रंश झाला असून त्या व्यक्तीला मदत करण्याच्या हेतूने जागरूक नागरिकांनी सामाजिक कार्यकर्त्यांच्या कानावर हि बाब घातली आणि आज पोलीस आणि १०८ रुग्णवाहिकेचा माध्यमातून बेळगाव जिल्हा रुग्णालयाच्या मानसिक स्वास्थ्य विभागात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
सामाजिक कार्यकर्ते सुरेंद्र अनगोळकर यांच्या पुढाकारातून आज सदर बेघर व्यक्तीची माहिती घेण्यात आली आली. यावेळी त्या व्यक्तीने आपले नाव डॉ. उमेश रोहिल्ला असे सांगितले. त्याने मुंबई येथील एका नामांकित वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएस शिक्षण पूर्ण केले असून त्यांना अनेक वैद्यकीय सांड्या माहित असल्याचे त्याच्याशी झालेल्या चर्चेमुळे समोर आले आहे. फेसबुक आयडी आणि ईमेल आयडी त्याने विसरली आहे शिवाय त्याच्या घरचा पत्ताही त्याच्या लक्षात नाही.
सदर व्यक्ती अस्खलित इंग्लिश आणि हिंदी भाषा बोलत आहे. त्याच्याशी चर्चा केल्यानंतर तो मानसिकदृष्ट्या अस्थिर असल्याचे लक्षात आले. सदर व्यक्ती मद्यपी किंवा कोणत्याही व्यसनाच्या आहारी गेला नसल्याचेही निदर्शनात आले आहे. यादरम्यान पोलीस विभाग आणि १०८ रुग्णवाहिकेचा सहकार्याने बेळगावच्या जिल्हा रुग्णालयातील मनोरुग्ण विभागात सदर व्यक्तीला पुढील उपचारासाठी हलविण्यात आले असून नागरिकांनी या व्यक्तीला त्याचा पत्ता शोधण्यासाठी मदत करण्याची विनंती करण्यात आली आहे.
या व्यक्तीशी संबंधित फोटो किंवा कोणतीही संलग्न माहिती मिळाल्यास बेळगाव जिल्हा रुग्णालयाशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
या व्यक्तीला जिल्हा रुग्णालयात हलविण्यासाठी बेळगाव पोलीस उपयुक्त शेखर आणि पोलीस पथकानेही मोठे सहकार्य केले. यावेळी हेल्प फॉर निडीचे सुरेंद्र अनगोळकर, फेसबुक फ्रेंड्स सर्कलचे प्रमुख संतोष दरेकर, योगेंद्र आणि चिन्मय आदींनी सहकार्य केले.