बेळगाव लाईव्ह : मान्सून लांबल्याने शेतीची कामे लांबली आहेत. पावसाला सुरुवात झाल्यानंतर एकाचवेळी सर्वत्र शेतीकामाला जोर येणार असून यादरम्यान बियाणे आणि खतांचा तुटवडा भासू नये यासाठी अधिकाऱ्यांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी अशी सूचना कृषी विभागाचे मंत्री एन. चेलुवरायस्वामी यांनी केली.
आज जिल्हा पंचायत सभागृहात मान्सूनच्या पूर्वतयारीबाबत झालेल्या अधिकाऱ्यांच्या विभागस्तरीय बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी पेरणी, बियाणे व खतांची मागणी, पुरवठा आणि वितरण यावर अधिकाऱ्यांनी बारीक लक्ष ठेवावे. पावसाच्या विलंबामुळे शेतकरीही चिंतेत आहेत. त्यामुळे बियाणे-खत वितरणाबाबत तक्रारी येऊ नयेत, याची काळजी घ्यावी.पेरणीसाठी बियाणे आणि खतांचा पुरेसा साठा असल्याने कोणतीही अडचण येऊ नये.
सर्व अधिकाऱ्यांनी समन्वयाने व शिस्तीने काम करावे. क्यूआर कोडद्वारे बियाणे वाटप केले जात आहे, काही वेळा तांत्रिक अडचण आल्यास पर्यायी व्यवस्था करावी. यात काही अडचण आल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असा इशारा मंत्री चेलुवरायस्वामी यांनी दिला.
ते पुढे म्हणाले, बियाणे-खत विक्री केंद्रांची स्वत: तपासणी करून साठा व पुरेशा प्रमाणात वितरणासाठी कार्यवाही करावी. नुकत्याच झालेल्या पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचे संयुक्त सर्वेक्षण तातडीने पूर्ण करून आकडेवारी सादर करावी. रिलीफ पोर्टलवर नोंद करावी.
शेतकर्यांच्या तक्रारी लवकरात लवकर मिटाव्यात यासाठी हेल्पलाइन केंद्रे स्थापन करावीत. तक्रारींना तत्काळ प्रतिसाद द्यावा असे निर्देश त्यांनी दिले.
या बैठकीला कृषी संचालक जी टी पुत्र, अतिरिक्त कृषी संचालक सी बी बालरेड्डी, जिल्हा पंचायतचे मुख्य कार्यकारी अधिकारी हर्षल भोयर, अतिरिक्त जिल्हाधिकारी के. टी. शांतला आदींसह विविध अधिकारी, बेळगावसह विजापूर, बागलकोट, गदग, हावेरी, बेळगाव, उत्तर कन्नड, धारवाड या जिल्ह्यांचे कृषी सहसंचालक सहभागी झाले होते.