बेळगावचे माजी पोलीस आयुक्त बीएस लोकेश कुमार यांची आता बेळगाव उत्तर विभाग आयजीपी अर्थात पोलीस महानिरीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या पदावर असलेल्या आणि परिश्रमपूर्वक उत्तर विभाग सांभाळलेल्या आयजीपी एन. सतीश कुमार यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे.
बेळ्ळारी येथून बी. एस. लोकेश कुमार (केएन -2005) यांची बेळगावचे आयजीपी म्हणून तातडीने नियुक्ती केली गेली आहे. साधी राहणी आणि लोकांची मैत्रीपूर्ण संबंध ठेवणाऱ्या नूतन आयजीपी लोकेश कुमार यांच्या नियुक्तीचे बेळगाव परिसरात स्वागत होत आहे. हुबळी -धारवाड शहराचे पोलीस महानिरीक्षक आणि पोलीस आयुक्त असलेले रमण गुप्ता यांची बदली बेळगाव उत्तर विभाग पोलीस महानिरीक्षक पदी करण्यात आली होती.
मात्र आता तडकाफडकी त्यांची बदली बेंगलोर शहराच्या (पूर्व) अतिरिक्त पोलीस आयुक्त पदी करण्यात आली आहे. तेथील विद्यमान अतिरिक्त पोलीस आयुक्त चंद्रशेखर यांची अन्यत्र बदली केली गेली आहे.
दरम्यान, बेळगावचे पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या यांचीही बदली झाली असून त्यांची म्हैसूर दक्षिण विभागाचे पोलीस उपसंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
सध्या राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे सत्र काँग्रेस सरकारने सुरू केले आहे. पोलीस आयुक्त डाॅ. बोरलिंगय्या यांची बदली झाली असली तरी त्यांच्या जागी अद्याप नवीन आयुक्तांचे नांव निश्चित झालेले नाही. त्यामुळे बेळगावचे नवे पोलीस आयुक्त कोण असणार? याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे