न्यायप्रविष्ठ शेत जमिनीच्या वादातून दोन गटात तलवारी, लाठ्या-काठ्या घेऊन झालेल्या तुंबळ हाणामारीमध्ये 10 जण जखमी झाल्याची घटना बेकिनकेरे (ता. जि. बेळगाव) येथे काल गुरुवारी घडली. फक्त हाणामारी करून न थांबता एका गटाने दुसऱ्या गटाची भात पेरणी केलेली शेती नांगरून उध्वस्त केली.
पुंडलिक नागो सावंत (वय 47), राजू नागो सावंत (वय 42), ज्योतिबा नागो सावंत (वय 45), अभिषेक पुंडलिक सावंत (वय 24), सुनिता पुंडलिक सावंत (वय 42), कविता राजू सावंत (वय 40), वनिता ज्योतिबा सावंत (वय 40), कार्तिक राजू सावंत (वय 15), श्रीराज सावंत (वय 12) आणि विघ्नेश्वर सावंत (वय 12, सर्व रा. बेकिनकेरे) हाणामारी जखमी झालेल्यांची नावे आहेत.
बेकिनकेरे येथील सर्व्हे नं. 85/1 85/2 मधील 9 एकर 30 गुंठे जमिनीवर सावंत कुटुंबीयांचा ताबा आहे. मात्र दुसरा गट देखील या जमिनीवर मालकी हक्क सांगत असल्यामुळे गेल्या अनेक वर्षापासून हा जमिनीचा वाद न्यायप्रविष्ठ आहे.
सावंत कुटुंबीय काल गुरुवारी सकाळी भात पेरणीसाठी शेतावर गेले असता 50 जणांचे एक टोळके तलवारी, लाठ्याकाठ्या घेऊन त्याठिकाणी आले आणि त्यांनी वादाला सुरुवात केली.
या वादाचे पर्यवसान जोरदार हाणामारीत होऊन सावंत कुटुंबातील 10 जण जखमी झाले. फक्त हाणामारी करून न थांबता त्या संतप्त टोळक्याने पेरलेल्या भातावर ट्रॅक्टरच्या सहाय्याने नांगर फिरवून ते उध्वस्त केले.
सर्व जखमींना उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून याप्रकरणी काकती पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे