सामूहिक योगाद्वारे प्रशासनातर्फे आं. रा. योग दिन साजरा-बेळगाव जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत, महानगरपालिका आणि जिल्हा आयुष्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आज बुधवारी सकाळी सुवर्ण विधानसौध प्रांगणात सामूहिक योगासने करून 9 वा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला.
बेळगाव सुवर्ण विधानसौध प्रांगणात आज सोमवारी सकाळी 6 ते 8 वाजेपर्यंत आंतरराष्ट्रीय योग दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी खासदार इरण्णा कडाडी यांच्यासह अन्य लोकप्रतिनिधी तसेच जिल्हाधिकारी नितेश पाटील, जिल्हा पंचायत सीईओ हर्षल भोयर, जिल्हा पोलीस प्रमुख डाॅ. संजीव पाटील, जिल्हा आयुष अधिकारी डॉ. श्रीकांत सुळधोळी आदी प्रशासकीय आणि पोलीस अधिकारी उपस्थित होते. जिल्ह्यातील विविध योगा संघटनांच्या सहकार्याने आयोजित सदर कार्यक्रमांमध्ये नागरिकांनीही मोठ्या संख्येने भाग घेतला होता. योग दिनाच्या निमित्ताने यावेळी सामूहिक योगासनं सादर करण्यात आली.
त्याचप्रमाणे योगासनपटुनी योगा प्रात्यक्षिके सादर केली. योगा तज्ञांनी शरीर आणि आरोग्यासाठी योगासनांची माहिती देऊन त्यांचे महत्त्व विशद केले. सुवर्ण विधानसौध प्रांगणात लोकप्रतिनिधींसह सरकारी अधिकारी, कर्मचारी आणि शेकडो नागरिक एकाच वेळी करत असलेली सामूहिक योगासनं लक्षवेधी ठरत होती.
*नववा आंतरराष्ट्रीय योग दिवस मारुती मंदिरात साजरा*
बेळगाव- “आज प्रत्येक जण आपापल्या कामात व्यस्त असला तरीही प्रत्येकाने नियमितपणे योग करण्याची गरज आहे त्या दृष्टीने गेल्या पाच वर्षांपासून आपण जो योगा वर्ग इथे चालू ठेवला आहे त्यातील सातत्य पाहून कौतुक वाटते त्यासाठी श्री कुलकर्णी सरांचे अभिनंदन” अशा शब्दात वार्ड क्रमांक 29 चे नगरसेवक श्री नितीन जाधव यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
घुमटमाळ मारुती मंदिर हिंदवाडी येथे मराठा जागृती निर्माण संघाच्या वतीने सुरू असलेल्या एक्सलंट योगा क्लास तर्फे नववा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास पाहुणे म्हणून नगरसेवक नितीन जाधव हे उपस्थित होते. त्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले.
अनंत लाड यांनी प्रास्ताविक करून योग दिनाचे महत्त्व सांगितले. त्यानंतर योग गुरु एस बी कुलकर्णी यांचा हिरालाल पटेल यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला तर योग गुरु एस बी कुलकर्णी यांच्या हस्ते नगरसेवक नितीन जाधव यांचा सन्मान करण्यात आला. श्रीमती एम एम कुलकर्णी मॅडम यांनी योगाचे महत्त्व विशद करताना ‘आजचे युग हे मानसिक क्रांतीचे युग आहे प्रत्येकाने वेळ आणि मन यांचे नियोजन करून रोज ठराविक वेळेत योगा केल्यास जीवनात अमुलाग्र बदल होतो त्यासाठी प्रत्येकाने योग करावा’ असे सांगितले.
याप्रसंगी शिवशंकरी नायक व मराठा जागृती निर्माण संघाचे अध्यक्ष गोपाळराव बिर्जे यांचीही भाषणे झाली.” इतरांना योगा शिकवीत असताना माझाही नेहमीच योगा पूर्ण होतो” असे सांगून कुलकर्णी सर यांनी समाधान व्यक्त केले. अनेक योगसाधक उपस्थित असलेल्या या कार्यक्रमाची सांगता किसन दड्डीकर यांच्या आभार प्रदर्शनाने झाली.
हालगा प्राथमिक मराठी शाळेत योग दिन साजरा
हालगा प्राथमिक मराठी मुला -मुलींच्या शाळेतर्फे आज नववा आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. योग दिनानिमित्त शाळेतील विद्यार्थी -विद्यार्थिनींनी योगासनाची सामूहिक प्रात्यक्षिके सादर केली. शाळेचे मुख्याध्यापक एम. व्ही. चौगुले यांच्या अध्यक्षतेखाली सदर आंतरराष्ट्रीय योग दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी शारीरिक शिक्षक अन्वर लंगोटी, व्ही. जी. गतिबंधे, आर. एम. मोरे, एम. ए. देसाई, एस. बी. भोसले, आर. एम. घोरपडे, ए. एस. बागेवाडी आणि एस. बी. सपारे या शिक्षक वर्गासह शिक्षकेतर कर्मचारी आणि पालक उपस्थित होते.