आपल्या खात्याकडून अचानक करण्यात आलेली अन्यायकारक वीजदर वाढ सर्वसामान्य जनतेला त्रासात टाकणारी असून ही दरवाढ तात्काळ मागे घ्यावी, अशी मागणी जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव (मेन) या संघटनेने शहरातील हेस्कॉमच्या कार्यकारी अभियंत्यांकडे केली आहे.
जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव मेनचे अध्यक्ष सुनील मुतगेकर यांच्या नेतृत्वाखालील संघटनेच्या शिष्टमंडळाने आज सकाळी नेहरूनगर येथील हेस्कॉम कार्यालयात जाऊन कार्यकारी अभियंत्यांकडे वीज दरवाढ कमी करण्याच्या मागणीचे निवेदन सादर केले.
आमची संघटना ही सामाजिक कार्य करणारी संघटना असून गेल्या 37 वर्षापासून ती शहरात कार्यरत आहे. आपल्या खात्याकडून गेल्या मे महिन्यात विजेच्या दरामध्ये अवास्तव वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे सर्वसामान्य मध्यमवर्गीय नागरिकांची अवस्था दयनीय झाली आहे. देशातील वाढत्या महागाईमुळे आधीच सर्वजण त्रस्त झाले असून प्रत्येकाला जगण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे.
अशा परिस्थितीत अचानक करण्यात आलेली ही अन्यायी वीज दरवाढ सर्वसामान्यांच्या डोक्यावरील बोजा वाढवणारी आहे, असा तपशील निवेदनात नमूद असून सदर वीज दरवाढ तात्काळ मागे घेण्यात यावी, अशी विनंती करण्यात आली आहे.
निवेदन सादर करतेवेळी सुनील मुतगेकर यांच्यासह अविनाश पाटील, विजय बळसुर, मुकुंद महागांवकर, भरत गावडे, अनिल चौगुले, आनंद कुलकर्णी, अजित कोकणे, पुंडलिक पावशे आदी उपस्थित होते.