बेळगाव लाईव्ह : बेळगाव प्रांताधिकारी कार्यालयाचे तहसीलदार अशोक मण्णीकेरी यांचा मृत्यू वादाच्या भोवऱ्यात अडकला असून त्यांचा मृत्यू संशयास्पद झाल्याची तक्रार त्यांच्या कुटुंबीयांनी केली आहे. बेळगावच्या प्रांताधिकारी कार्यालयाचे तहसीलदार अशोक मण्णीकेरी यांचे बुधवारी (दि. २८ जून) मध्यरात्री निधन झाले. त्यानंतर त्यांचा मृत्यू हा नैसर्गिक रित्या झाला नसून संशयास्पदरित्या झाल्याची तक्रार त्यांच्या बहिणींनी केली आहे. याबाबत कॅम्प पोलीस स्थानकात तक्रार नोंदविण्यात आली आहे.
अशोक मण्णीकेरी यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली,पाच बहिणी असा मोठा परिवार आहे. मण्णीकेरी यांच्या मृत्यची बातमी समजताच त्यांच्या नातेवाईकांनी आणि समर्थकांनी कॅम्प पोलीस स्थानकासमोर मोठी गर्दी केली होती. यादरम्यान मण्णीकेरी यांचे मेव्हणे आणि पत्नीवर हल्ल्याचाही प्रयत्न झाला आहे. मण्णीकेरी यांची मोठी बहीण गिरीजा यांनी अशोक मण्णीकेरी यांचा मृत्यू संशयास्पद झाल्याची तक्रार नोंदविली असून घातपाताचा संशयही व्यक्त केला आहे. त्यांच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यात आली असून पोलीस तपासाअंती मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे.
अशोक मण्णीकेरी हे मनमिळावू अधिकारी म्हणून परिचित होते. बेळगाव शहरात महसूल खात्यासंदर्भातील विविध अडीअडचणीत त्यांनी अनेकांना मदत केली आहे. बेळगाव शहरातील विविध क्षेत्रात त्यांचा मोठा जनसंपर्क होता. त्यांच्याकडे समस्या घेऊन येणाऱ्या प्रत्येकाला त्यांनी सहकार्य केले असून गेल्या ४ वर्षात त्यांनी मोठा जनसंपर्क जोडला आहे. मागील काही वर्षात त्यांनी ग्रामीण मतदार संघाच्या आमदार आणि विद्यमान मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचे स्वीय सहायक म्हणून काम पाहिले होते. त्यामुळे त्यांच्या कामाची व्याप्ती अधिक होती.
त्यांच्या मृत्यूची बातमी समजताच आमदार हेब्बाळकर यांनी त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले. अशोक मण्णीकेरी यांच्यावर गुरुवारी सायंकाळी उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांच्या कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. त्यांच्या निधनानंतर अनेक दलित संघटनेच्या नेत्यांनी शोक व्यक्त केला असून निधन वार्ता समजताच त्यांच्या काळी आमराई येथील निवासस्थानी मोठी गर्दी जमली होती. त्यांच्या निधनाने महसूल क्षेत्रातील उमदे व्यक्तिमत्व हरपल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे.