राज्यभरातील महिलांसाठी मोफत बस प्रवास उपलब्ध करून देणाऱ्या ‘शक्ती’ योजनेचा मूळ उद्देश महिलांचे सक्षमीकरण करणे हा आहे. शिक्षण, व्यावसायिक कौशल्य विकास यासारख्या उद्देशांसाठी या योजनेचा लाभ घेऊन महिलांनी सर्वप्रकारे सक्षम व्हावे, असे आवाहन सार्वजनिक बांधकाम खाते आणि बेळगाव जिल्ह्याचे पालक मंत्री सतीश जारकीहोळी यांनी केले.
बेळगाव मध्यवर्ती बसस्थानक परिसरात आज रविवारी दुपारी महिलांसाठी मोफत बस प्रवास उपलब्ध करणाऱ्या सरकारच्या‘शक्ती’ योजनेचा शुभारंभ केल्यानंतर मंत्री जारकीहोळी बोलत होते. वायव्य कर्नाटक रस्ते परिवहन महामंडळाच्या बेळगाव आणि चिक्कोडी विभागाच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कर्नाटक राज्याच्या इतिहासात हा दिवस मैलाचा दगड आहे.
राज्यभरातील महिलांना मोफत बस प्रवास देण्यासाठी शक्ती योजना सुरू करण्यात आली आहे. हा प्रकल्प ऐतिहासिक असून तो देशासाठी आदर्श ठरेल. शक्ती योजना अत्यंत कमी कालावधीत कार्यान्वित झाली आहे. असे सांगून सदर योजनेच्या अनुकूल आणि प्रतिकूल परिणामांबाबत यापूर्वीच सखोल चर्चा झाली आहे, असे मंत्री जारकीहोळी पुढे म्हणाले.
ही योजना राज्यातील महिलांना प्रवासाच्या खर्चात बचत करण्याच्या दृष्टीने फायदेशीर ठरणार असून दररोज कामावर जाणाऱ्या आणि छोट्या कामासाठी रोज प्रवास करणाऱ्या शक्ती योजनेचा नक्कीच फायदा होईल. या पद्धतीने काँग्रेस सरकारने दिलेल्या हमींपैकी पहिली हमी योजना लागू करण्यात आली आहे. इतर हमी योजनाही लवकरच राबविण्यात येत आहेत. पक्षाने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करून त्याची अंमलबजावणी केली जात आहे. महिलांना शक्ती स्मार्ट कार्डमुळे राज्यभर मोफत प्रवासाची सुविधा मिळणार आहे. सरकारवर आर्थिक बोजा असतानाही तोट्यात चालणारी परिवहन कंपनीही अल्पावधीत चांगला नफा कमवून आर्थिकदृष्ट्या सुदृढ होईल, असा विश्वासही पालकमंत्री मंत्री सतीश जारकीहोळी यांनी व्यक्त केला. याप्रसंगी महिला आणि बालकल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, बेळगाव उत्तरचे आमदार असिफ सेठ आदी मान्यवरांसह परिवहन मंडळाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
बेळगावप्रमाणे आजपासून राज्यभरात महिलांच्या मोफत बस प्रवासासाठीच्या ‘शक्ती’ योजनेचा प्रारंभ झाला आहे. या योजनेद्वारे राज्यांतर्गत महिलांना परिवहन बसमध्ये विना तिकीट प्रवास करता येणार आहे. कर्नाटक राज्यातील महिलांसह 6 ते 12 वयोगटातील मुलींनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे. महिलांना राज्यामध्ये सामान्य आणि एक्सप्रेस बसने बस प्रवास करता येईल. यात लांब पल्ल्याच्या प्रवासाची संधी ही महिलांना उपलब्ध आहे. तथापि मेघदूत, एसी -नॉन एसी, ऐरावत अशा आरामदायी बसमध्ये महिलांना मोफत प्रवास सुविधा उपलब्ध असणार नाही.
मोफत प्रवासासाठी महिलांना आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स, घरचा पत्ता असलेले कोणतेही एक अधिकृत ओळखपत्र यापैकी एक प्रवासाच्या वेळी बस वाहकाला दाखवावे लागेल. शक्ती योजनेचे स्मार्ट कार्ड मिळाल्यानंतर महिलांना या ओळखपत्रांची आवश्यकता भासणार नाही.