Saturday, December 21, 2024

/

पालक मंत्री होताच सतीश जारकीहोळी यांनी जाहीर केलेली योजना

 belgaum

बेळगाव शहरांमध्ये फ्लाय ओव्हर ब्रिज उभारण्याची धुळखात पडून असलेली योजना आता प्रत्यक्षात उतरवण्यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम खात्याचे (पीडब्ल्यूडी) मंत्री सतीश जारकीहोळी यांनी पुढाकार घेतला असून त्यासंदर्भात त्यांनी नुकतीच पीडब्ल्यूडी अधिकाऱ्यांची बैठक घेतली. मिळालेल्या माहितीनुसार गांधीनगरपासून थेट पिरनवाडीपर्यंत फ्लाय ओव्हर ब्रिज उभारण्याची योजना आहे.

गेल्या 2018 मध्ये बेळगाव स्मार्ट सिटी लिमिटेडने शहरानजीकचा राष्ट्रीय महामार्ग क्र. 4 ते अशोक सर्कल मार्गे मध्यवर्तीय बसस्थानक असा फ्लाय ओव्हर ब्रिज उभारण्याची योजना आखली होती, मात्र ती प्रत्यक्षात उतरलीच नाही. सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री असण्याबरोबरच जिल्हा पालकमंत्री असलेल्या सतीश जारकीहोळी यांनी शहरातील अवजड वाहतुकीची समस्या निकालात काढण्यासाठी आता या धूळ खात पडून असलेल्या फ्लाय ओव्हर प्रकल्पात विशेष स्वारस्य दाखवण्यास सुरुवात केली आहे.

आधीच्या योजनेनुसार राष्ट्रीय महामार्ग क्र. 4 (एनएच -4) पासूनचा फ्लाय ओव्हर अशोक सर्कल येथे दुभागला जाऊन एकीकडे खडेबाजार रोडला आणि दुसरीकडे सर्किट हाऊस मार्गे मध्यवर्ती बस स्थानकाला जोडला जाणार होता. राष्ट्रीय महामार्गापासून शहरापर्यंतच्या अंतरामध्ये हा फ्लाय ओव्हर संमिश्र वाहतूक असणाऱ्या गांधीनगर, महांतेशनगर, अशोक सर्कल आणि भाजी मार्केट या चार जंक्शन मार्गे जाणार होता.

स्मार्ट सिटीच्या योजनेनुसार अशोक सर्कलपासूनच्या फ्लाय ओव्हरसाठी (एनएच -4 जंक्शन ते सीबीटी व्हाया रायचूर बाची रोड) 129 कोटी रुपये खर्च येणार होता. तथापि आत्ताची नवी योजना महत्त्वाकांक्षी असणार असून या योजनेनुसार गांधीनगर येथील राष्ट्रीय महामार्ग क्र. 4 पासून थेट पिरनवाडीपर्यंत फ्लाय ओव्हर ब्रिज उभारण्यात येईल. नवा फ्लाय ओव्हर ब्रिज उभारताना या ब्रिजच्या माध्यमातून बेळगाव मध्यवर्ती बस स्थानकासाठी समर्पित प्रवेश आणि निर्गमनाची सोय देखील उपलब्ध करून दिली जाणार आहे.

ashok-circle-flyover
File:Old plan fly over made 2018

बेळगाव येथून राष्ट्रीय महामार्गापासून थेट पिरनवाडीपर्यंत फ्लाय ओव्हर झाल्यास बेळगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना देशोधडीला लावणाऱ्या शहराच्या रिंग रोडची देखील फारशी आवश्यकता भासणार नसल्याचे जाणकारांचे मत आहे.

बेळगाव शहरातील वाहतूक समस्या निकालात काढण्यासाठी अलीकडच्या काळात शहराच्या रिंगरोड योजनेचा गाजावाजा होत आहे. सुपीक जमीन नष्ट होणार असल्यामुळे शेतकऱ्यांचा या योजनेला तीव्र विरोध आहे. बेळगाव शहराचा रिंग रोडचा प्रस्ताव असून त्यासाठी बेळगाव तालुक्यातील शेकडो एकर सुपीक जमीन संपादित केली जाणार आहे.Satish jarkiholi

ही सुपीक जमीन वाचावी आणि तालुक्यातील लहान शेतकरी देशोधडीला लागू नयेत यासाठी बेळगाव लाईव्हने सर्वप्रथम आवाज उठविला होता. त्याचप्रमाणे महाराष्ट्र एकीकरण समितीने शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहून रिंग रोडला प्रखर विरोध केला आहे. या परिस्थितीत तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जमिनी वाचविण्याच्या दृष्टिकोनातून जिल्हा पालकमंत्री जारकीहोळी यांनी पुढाकार घेऊन फ्लाय ओव्हर ब्रिज योजनेवर लक्ष केंद्रित केल्यामुळे त्यांच्या या कृतीची प्रशंसा होत असून शेतकऱ्यांकडून त्यांना दुवा दिला जात आहे. त्याचप्रमाणे मुंबई, नाशिक, नागपूरच्या धर्तीवर बेळगावमध्ये जर फ्लाय ओव्हर झाले तर रिंग रोडची गरजच भासणार नाही, दळणवळणही सुरळीत होईल.

महत्त्वाची बाब म्हणजे शहरा नजीक तालुक्यात असलेल्या शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी नष्ट होणार नाहीत. त्यामुळे एकंदरच मंत्री सतीश जारकीहोळी यांनी फ्लाय ओव्हर ब्रिजची योजना प्रत्यक्षात उतरवली तर शहरातील वाहतुकीची समस्या निकालात निघण्याबरोबरच शेतकऱ्यांवरील मोठे संकट टळणार आहे. याखेरीज शहराचा कायापालट होण्यास मदत होणार असून फ्लाय ओव्हर ब्रिजची उभारणी हा शेतकऱ्यांच्या दृष्टीने हिताचा निर्णय ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.