बेळगाव लाईव्ह : ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना शेततळे,मत्स्य तळे मंजूर करुन देण्यासह ग्रामीण भागातील तलाव, नदी, कालवे यामध्ये मत्स्य उत्पादन घेण्याच्या प्रमाणात वाढ झाली असून आता बेळगाव जिल्ह्याच्या ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात येणाऱ्या १९४ तलावांमध्ये मत्स्यपालन केले जाणार आहे.
त्यामुळे जिल्ह्यात मत्स्य उत्पादन वाढेल. शिवाय, ग्रामपंचायतींनाही या माध्यमातून महसूल उपलब्ध होणार आहे. दरम्यान, या योजनेमुळे जिल्ह्यातील मत्स्य उत्पादनात १५ टनांनी वाढ होईल.
बेळगाव जिल्ह्यात मत्स्य उत्पादनात दरवर्षी वाढ होत आहे. मागील पाच वर्षांत जिल्ह्यातील मत्स्य उत्पादन चार हजार ६५१ टनांनी वाढले आहे. त्यामुळे मागील पाच वर्षात जिल्ह्यातील उत्पादन दुप्पटीने वाढले आहे.
जिल्ह्यात शेतीसाठी म्हणून १,८४५ शेततळे, ३२४ तलाव निर्माण करण्यात आले आहेत. यात आता मत्स्य उत्पादनही घेतले जात आहे. शेतकरी आणि मध्यमवर्गीय लोकांना यातून लाभ मिळवून दिला जात आहे. मागील पाच वर्षांत मत्स्य उत्पादनाची मागणीही वाढली आहे. त्यामुळे हिडकल व सौंदत्ती येथील मत्स्य उत्पादन केंद्रातून दरवर्षी ५८ लाख लहान मासे उपलब्ध करुन दिले जात आहेत. मागणीनुसार या लहान माशांचा पुरवठा होत आहे.
बेळगाव जिल्ह्यात ४९८ ग्रामपंचायती असून, त्यांच्या मालकीचे ६०० तलाव आहेत. काही तलावांवर अतिक्रमण झाले असून, गाळ न काढल्याने अनेक तलावांत वर्षभर पाणी थांबत नाही. केवळ पावसाळ्यातच चार ते पाच महिने अशा तलावात पाणी राहते; तर १९४ तलावांत वर्षभर पाणी थांबते. मत्स्योद्योग खात्याकडून प्रत्येक तलावाला चार हजारांप्रमाणे एकूण सात लाख ५० हजारांहून अधिक माशांची पिले मोफत दिली जाणार असून ग्रामपंचायती पिल्ले आपल्या तलावात सोडून मत्स्यपालन करून पुढे त्याची विक्रीही करू शकणार आहेत. यातून मिळणारा सर्व महसूल ग्रामपंचायतीलाच असणार आहे.
मत्स्य खात्याच्या कार्यक्षेत्रात २२१ तलाव असून, यापैकी १६० तलावात तसेच हिडकल, नविलुतीर्थ जलाशय, घटप्रभा, मलप्रभा, कृष्णा, मार्कंडेय नदीमध्ये मत्स्यपालन केले जात आहे. जिल्ह्यातील १६० तलावांमध्ये पाच हजार ४६० टन मत्स्य उत्पादन होत आहे.
कृष्णा, घटप्रभा, मलप्रभा नदीत ३०० टन तसेच जिल्ह्यातील २० हजार ५६० शेततळ्यात एक हजार २४० टन, ७० हजार हेक्टर प्रदेशातील जलाशयात एक हजार ५०० टन मत्स्य उत्पादन घेतले जात आहे. याला आता ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रातील तलावांचीही जोड मिळणार आहे.