प्रत्येक कुटुंबाला 200 युनिटपर्यंत वीज मोफत देण्याच्या योजनेच्या बाबतीतील संभ्रम दूर करताना सरकारच्या ‘गृहज्योती’ योजनेचा लाभ नव्याने बांधलेली अथवा खरेदी केलेली घरे आणि नवीन भाडेकरू यांनाही मिळणार असल्याचे ऊर्जा खात्याने स्पष्ट केले आहे. याला खुद्द ऊर्जा मंत्री के. जे. जॉर्ज यांनी दुजोरा दिला आहे.
बेंगलोर विधानसौध येथे काल गृहज्योती प्रकल्प संदर्भात ऊर्जा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतल्यानंतर बोलताना मंत्री जॉर्ज म्हणाले, नव्याने बांधलेले घरे आणि नव्या भाडेकरूंनाही गृहज्योती योजनेमध्ये समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ज्यांनी नवी घरे बांधली आहेत, जे नवे भाडेकरू आहेत थोडक्यात नवीन वीज कनेक्शन घेणाऱ्यांनाही गृहज्योती योजनेचा लाभ मिळेल. सरकारने नव्याने बांधलेली घरे आणि भाडेकरूंसाठी सरासरी 53 युनिट्स वीज मोफत असेल. त्यात 10 टक्के अधिक युनिट म्हणजे एकूण 58 ते 59 युनिट मोफत दिली जाईल.
या सरासरीत वीज वापरली तर ‘शून्य’ बिल देखील मिळेल. तथापि यापेक्षा जास्त वीज वापरल्यास वीज ग्राहकांना अतिरिक्त विजेचे बिल भरावे लागेल. नवीन सरासरी निर्धारित करण्यासाठी नवीन गृहनिर्माण आणि भाडेकरूंची सरासरी 12 महिन्यानंतर घेतली जाईल. तोपर्यंत सरासरी 53 युनिट्स बरोबर 10 टक्के युनिटची अतिरिक्त वीज मर्यादा असणार आहे, असे ऊर्जामंत्री के. जे. जॉर्ज यांनी स्पष्ट केले.