बेळगाव लाईव्ह : बेळगाव स्मार्ट सिटी झाल्यापासून येथे अनेक ठिकाणी सुशोभीकरण, उद्यानांची व्यवस्था, हायटेक बसस्थानक आणि रेल्वेस्थानक अशा अनेक व्यवस्था करण्यात आल्या आहेत. या विकासकामात त्रुटी दिसत असल्या तरी काही अंशी बदल दिसून येत आहेत.
मात्र याचा फायदा सर्वसामान्य नागरिकांच्या सोयीसाठी होण्याऐवजी अनेक ठिकाणी भटकी जनावरे, पार्किंग शेड, जाहिरातबाजी, भिक्षुकांसाठी आसरा तर अनेक ठिकाणी निराधार, असहाय्य्य आणि बेघरांसाठी होत असल्याचे निदर्शनात येत आहे.
बेळगावमध्ये सध्या अशीच एक अज्ञात व्यक्ती मध्यवर्ती बसस्थानक आणि रेल्वेस्थानकावर वावरताना दिसून येत आहे. हि व्यक्ती साधारण ६०-७० वयोगयातील असून त्यांच्यासोबत २ मोठ्या साहित्यासह पिशव्या देखील दिसून येत आहेत.
त्यांना मोतीबिंदूचा आजार देखील असल्याचे त्यांनी अनेकांना दिलेल्या माहितीवरून समोर आले आहे. सकाळच्या वेळेत मध्यवर्ती बसस्थानकावर तर संध्याकाळच्या वेळेस रेल्वेस्थानकावर हि व्यक्ती वावरताना दिसून येत आहे. सदर व्यक्तीचे एकंदर हावभाव पाहता हि व्यक्ती बेघर किंवा असहाय्य्य असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत असून काही समाजसेवकांनी त्यांची विचारपूस केली असता ते एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जाऊन आसरा घेत असल्याचे समजते आहे.
अनेक ठिकाणी असे प्रसंग दिसून येत असून रेल्वेस्थानक, बसस्थानक किंवा प्रशासकीय अधिकाऱ्यांनी यासंदर्भात गांभीर्याने लक्ष पुरविण्याची गरज आहे. अशापद्धतीने वावरणारे अनेक लोक दिवसभरात दिसून येतात.
त्यांची विचारपूस करून त्यांची योग्य ठिकाणी सोय करून त्यांना सहकार्य करण्यासाठी यंत्रणेने काम करणे आवश्यक आहे. अशा पद्धतीने वावरणाऱ्या नागरिकांकडून माहिती घेऊन त्यांना त्यांच्या योग्य जागी पाठविण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.