महिलांची मोफत बस प्रवासाची योजना शहरापासून 20 -25 कि.मी. अंतर सोडून अंमलात आणावी या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांचे निवेदन द ऑटो रिक्षा ओनर्स अँड ड्रायव्हर्स असोसिएशन बेळगावतर्फे आज जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले.
द ऑटो रिक्षा ओनर्स अँड ड्रायव्हर्स असोसिएशन बेळगावचे अध्यक्ष मन्सूर अब्दुल गफार होनगेकर यांच्या नेतृत्वाखाली आज बुधवारी सकाळी जिल्हाधिकाऱ्यांना उपरोक्त निवेदन सादर करण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांच्या सहाय्यकांनी निवेदनाचा स्वीकार करून योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे.
निवेदन सादर केल्यानंतर प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना मन्सूर होनगेकर म्हणाले की, महिलांच्या मोफत बस प्रवास योजनेमुळे आमचा ऑटोरिक्षा धंदा संकटात सापडला आहे. बेळगाव शहरात 12000 परमिट ऑटो रिक्षा आहेत. तेंव्हा सरकारने परमिट बंद करावे. महिलांसाठी असलेली मोफत बस प्रवासाची योजना शहरापासून 20 -25 कि.मी. अंतराच्या पुढे लागू करावी. त्याला आमचा कोणताच विरोध नाही. सध्या मोफत बस प्रवास योजनेमुळे आमच्या ऑटोरिक्षा व्यवसायावर प्रतिकूल परिणाम झाला आहे. आम्हाला रिक्षाच्या कर्जाचे हप्ते भरणे कठीण झाले आहे. गेल्या 11 जूनपासून महिलांना बस प्रवास मोफत केल्यापासून आमचा रोजचा धंदा अत्यंत कमी झाला आहे. पूर्वी दररोज 500 रुपये कमाई होत होती, ती आता 200 ते 300 रुपये होत आहे. यात भर म्हणजे इन्शुरन्स वाढवण्यात आला आहे. सध्याची परिस्थिती लक्षात घेऊन इन्शुरन्सची रक्कम तरी कमी केली जावी.
कोणतेही सर्वेक्षण न करता सरकारने महिलांच्या मोफत बस प्रवासाची योजना अंमलात आणल्यामुळे फक्त ऑटोरिक्षा चालकच नव्हे तर मॅक्सीकॅब वगैरे सारख्या शहरातील सर्व खाजगी प्रवासी वाहतूकदारांना मोठा फटका बसला आहे. विशेष करून आम्ही फक्त शहरात कार्यरत असल्यामुळे सर्वाधिक फटका आम्हा ऑटोरिक्षा चालकांना बसला आहे. सरकारने आमचा विचारच केलेला नाही. आता सरकार गृहिणींना जसे 2000 रुपये देणार आहे तसे आम्हालाही 5000 रुपये द्यावेत. कारण आमच्या गाड्यांवर 2 -2 लाख रुपये कर्ज आहे. दरमहा आम्हाला 5 ते 6 हजार रुपये कर्जाचे हप्ते भरावे लागतात.
आता धंदाच झाला नाही तर आम्ही कर्जाचे हप्ते कसे? आणि कुठून भरायचे? कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवणे आणि घराचे भाडे भरणे आम्हाला कठीण झाले आहे असे सांगून सरकारने कृपया आमच्या परिस्थितीकडे गांभीर्याने लक्ष देऊन आमच्या मागण्यांची येत्या 8-15 दिवसात पूर्तता करावी अन्यथा आम्ही ऑटो रिक्षा बंद करून रस्त्यावर उतरू असा इशारा मन्सूर अब्दुल गफार होनगेकर यांनी दिला. याप्रसंगी ऑटो रिक्षा ओनर्स अँड ड्रायव्हर्स असोसिएशनचे अन्य पदाधिकारी आणि बहुसंख्य ऑटो रिक्षा चालक उपस्थित होते.