बेळगाव लाईव्ह : हल्लीच्या जगात प्रामाणिक लोक मिळणे तसे अवघडच आहे. रस्त्यातून जात जाताच लूटमार करून किमती ऐवज, रोख रक्कम लंपास करणारेही अनेक महाभाग आपण पाहात असतो.
मात्र हल्लीच्या अशा युगातही प्रामाणिकपणा दाखवत आपल्याला मिळालेले सोन्याचे दागिने परत करणारे कमीच! बेळगावच्या तरुणाने आज असाच प्रामाणिकपणा दाखवत आपल्याला मिळालेले सोन्याचे ब्रेसलेट मूळ मालकाला परत केले आहे.
याबाबतची अधिक माहिती असती अशी की, शहरातील एमव्हीएम इंग्लिश मीडियम स्कूल या शाळेशी संबंधित एका पालकाचे हातातील सोन्याचे ब्रेसलेट हरवले होते. ब्रेसलेट नेमके कुठे पडले हे माहीत नसल्याने त्यांनी शाळेपर्यंत सर्वत्र शोधाशोध केली मात्र ते सापडू शकले नाही. दरम्यान चव्हाट गल्ली येथील मुलांची वर्दी करणाऱ्या प्रवीण किल्लेकर या ऑटोरिक्षा चालकाला एमव्हीएम शाळेच्या आवारात ते सोन्याचे ब्रेसलेट सापडले. तेंव्हा त्याने ते प्रामाणिकपणे आपल्या परिचयाच्या शाळेतील एका वर्गशिक्षिकेकडे सुपूर्द केले. त्यांनी मग लागलीच संबंधित पालकांना माहिती देऊन ते ब्रेसलेट सुखरूपपणे त्यांच्याकडे सुपूर्द केले. याबद्दल प्रवीण किल्लेकर या ऑटोरिक्षा चालकाला त्या पालकासह त्यांच्या कुटुंबीयांनी शतशः धन्यवाद दिले आहेत.
आजच्या युगात माणुसकी आणि प्रामाणिकपणा लयाला जात असल्याचा आमचा समज होता. मात्र प्रवीण किल्लेकर याच्या कृतीमुळे आजही समाजातील बऱ्याच लोकात प्रामाणिकपणा व माणुसकी आहे, याची आम्हाला प्रचिती आली अशी प्रतिक्रियाही त्या कुटुंबीयांनी व्यक्त केली. एकंदर सध्याच्या अप्रमाणिक फसवेगिरीच्या जगात प्रवीण याने दाखविलेला प्रामाणिकपणा सध्या प्रशंसा आणि चर्चेचा विषय झाला आहे.