अलतगा ग्रामपंचायत आणि देवस्थान कमिटीतर्फे कंग्राळी खुर्द ते अलतगा दरम्यानच्या पुलावरील धोकादायक रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करावी या प्रमुख मागणीसह अन्य कांही मागण्यांचे निवेदन आज बुधवारी सकाळी बेळगाव तालुका पंचायत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना (सीईओ) सादर करण्यात आले.
अलतगा ग्रा. पं. अध्यक्ष चंद्रकांत धुडूम यांच्या नेतृत्वाखाली ग्रा.पं. सदस्य व देवस्थान कमिटी सदस्यांच्या शिष्टमंडळाने सादर केलेले उपरोक्त मागणीचे निवेदन ता. पं. सीईओंनी स्वीकारून योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. कंग्राळी खुर्द ते अलतगा गावादरम्यानचा मार्कंडेय नदीवरील पुलाचा रस्ता अतिशय खराब धोकादायक बनला असून तो युद्धपातळीवर दुरुस्त करावा.
या रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या झाडांच्या धोकादायक फांद्या हटवाव्यात आणि सदर रस्त्यावर पथदीप नसल्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला रेडियम पट्ट्या लावाव्यात अशा मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत. तसेच येत्या 8 -10 दिवसात मागण्याची पूर्तता न झाल्यास रास्तारोको आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
निवेदन सादर केल्यानंतर प्रसिद्धी माध्यमांना माहिती देताना ग्रा.पं. पदाधिकाऱ्यांनी कंग्राळी खुर्द ते अलतगा गावादरम्यानचा मार्कंडेय नदीवरील पुलाचा रस्ता अतिशय खराब झाला आहे. या रस्त्याचे काँक्रिटीकरण उखडून लोखंडी सळ्या धोकादायकरित्या वर डोकावत आहेत. परिणामी वाहन चालकांना या रस्त्यावरून ये -जा करणे कठीण झाले आहे.
रस्त्यांवरील सळ्यांमुळे अपघातासह वाहने पंक्चर होण्याचे प्रकार वाढले आहेत. तरी संबंधित अधिकाऱ्यांनी जातीने लक्ष घालून तात्काळ पावसाळ्यापूर्वी पुलाचा रस्ता दुरुस्त करून त्या सळ्या बुजवाव्यात. दुसरी गोष्ट म्हणजे वादळी वाऱ्यामुळे सदर रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या झाडाच्या फांद्या गेल्या आठवड्यात रस्त्यावर तुटून पडल्या होत्या. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन झाडांच्या धोकादायक फांद्या हटवून हा रस्ता रहदारीसाठी सुरक्षित करावा. या खेरीज सदर रस्त्यावर पथदिपांची सोय नाही. त्यामुळे पहाटे आणि रात्रीच्या वेळी रस्त्यावरून ये -जा करताना लोकांची गैरसोय होत आहे. तेंव्हा मार्केट यार्डपासून कडोलीपर्यंत रस्त्याच्या दुतर्फा रेडियम पट्ट्या बसवणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे लोकांना रस्त्याची किमान दिशा तरी समजू शकेल या तीन प्रमुख मागण्या आम्ही केल्या आहेत, असे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
तसेच या मागण्यांची येत्या 8 -10 दिवसात पूर्तता न झाल्यास रास्ता रोको आंदोलन छेडण्याचा इशाराही आम्ही दिला आहे असेही स्पष्ट केले. निवेदन सादर करतेवेळी अलतगा ग्रा. पं. अध्यक्ष चंद्रकांत धुडूम यांच्यासह सेक्रेटरी कल्लाप्पा चौगुले, ग्रा. पं. सदस्य चेतक कांबळे, गणपत सुतार, महेश पाटील, रुपेश चौगुले आदी उपस्थित होते.