आषाढी एकादशी निमित्त शहरातील मराठा मंडळ जिजामाता हायस्कूल, मराठा मंडळ सेंट्रल हायस्कूल आणि मराठा मंडळ हायस्कूल या तीनही शाळांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विद्यार्थी -विद्यार्थिनींची आषाढी वारी आज सकाळी अपूर्व उत्साहात पार पडली.
मराठा मंडळ जिजामाता हायस्कूल चव्हाट गल्ली येथून आज सकाळी मुख्याध्यापक एन. डी. पाटील आणि अन्य दोन शाळांच्या मुख्याध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी -विद्यार्थिनींच्या आषाढी वारीला प्रारंभ झाला. पंढरपूरच्या आषाढी वारीमध्ये ज्या पद्धतीने वारकरी स्त्री -पुरुष मंडळींचा पेहराव असतो त्याप्रमाणे वेशभूषा करून विद्यार्थी विद्यार्थिनींनी उस्फूर्तपणे आजच्या वारीत भाग घेतला होता.
त्यामुळे भजनी मेळ्यासह श्री विठ्ठल रखुमाईच्या नावाचा गजर करत सवाद्य निघालेली ही वारी साऱ्यांचे लक्ष वेधून घेत होती. चव्हाट गल्ली येथून सोन्या मारुती चौक अर्थात आरटीओ सर्कल, कोर्ट रोड, न्यायालय आवार मार्गे पुन्हा चव्हाट गल्ली येथील जिजामाता हायस्कूलच्या ठिकाणी वारीची सांगता झाली. त्यानंतर दुपारच्या सत्रात मुलामुलींचे भजन कीर्तन व इतर सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले.
शालेय मुला मुलींच्या या आषाढी वारीसंदर्भात बेळगाव लाईव्हशी बोलताना मराठा मंडळ जिजामाता हायस्कूलचे मुख्याध्यापक एन. डी. पाटील यांनी पंढरपूरच्या आषाढी आणि कार्तिकी एकादशीच्या वारीचे महत्त्व विषद करून काल आषाढी एकादशी दिवशी सुट्टी असल्यामुळे आज या शालेय विद्यार्थी -विद्यार्थिनींच्या आषाढी वारीचे आयोजन करण्यात आले होते असे सांगितले.
या वारीत मराठा मंडळ जिजामाता हायस्कूल, मराठा मंडळ सेंट्रल हायस्कूल आणि मराठा मंडळ हायस्कूल मधील सुमारे 900 विद्यार्थी विद्यार्थिनींचा उस्फूर्त सहभाग होता. पंढरपूरला जाता आले नसले तरी मुलांना पंढरपूरच्या वारीचा अप्रत्यक्ष अनुभव मिळावा यासाठी या वारीचे आयोजन करण्यात आले होते. वारीतील मुलांनी कुर्ता पायजमा, मुलींनी साड्या या पद्धतीची वेशभूषा केली होती. पंढरपूरची वारी म्हणजे सर्व धर्म समभावाचे प्रतीक आहे. त्या अनुषंगाने आम्ही आयोजित केलेल्या आजच्या वारीत सर्व जाती-धर्माची मुले सहभागी झाली होती असे सांगून मुख्याध्यापक पाटील यांनी वारीच्या मार्गाची आणि वारी नंतर आयोजित कार्यक्रमांची माहिती दिली.
तसेच वारी यशस्वी करण्यासाठी पालक आणि तीनही शाळांच्या शिक्षकवर्गाचे बहुमोल सहकार्य लाभल्याचे त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे विद्यार्थी -विद्यार्थिनींची ही आषाढी वारी काढण्यास प्रोत्साहन दिल्याबद्दल मराठा मंडळ संस्थेचे अध्यक्ष राजश्री नागराजू हलगेकर आणि संचालक मंडळाचे मुख्याध्यापक एन. डी. पाटील यांनी खास आभार मानले.